पास्ता तयार करत तो झाला कोट्यधीश! | पुढारी

पास्ता तयार करत तो झाला कोट्यधीश!

न्यूयॉर्क : आपण एखादी कला आत्मसात करतो, त्यावेळी त्याचे अनेक फायदे आपल्याला कळत-नकळत होत असतात. मग ती कला भाजी विक्रीची असेल, शेतीची असेल किंवा स्वयंपाकाची. आता त्या व्यक्तीचे वय किती आहे, त्याचा यात काहीच फरक पडत नाही. फरक इतकाच पडतो की, समोरील व्यक्ती प्रेझेंटेशन कसे देते आहे. जर ती बाब क्लिक झाली तर क्षणार्धात ती व्यक्ती गर्भश्रीमंत होऊ शकते. अमेरिकेतील एका 23 वर्षीय युवकाबाबत असेच घडले असून पास्ता तयार करण्याचा व्हिडीओ करता करता तो कोट्यधीश होण्याच्या मार्गावर पोहोचला!

गियानलुंके कोटे असे या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे. सोशल मीडियावर त्याची बरीच क्रेझ आहे. ही क्रेझ सध्या अशा शिखरावर पोहोचली आहे की, त्याला अगदी एका पोस्टसाठी देखील एक लाख रुपये मिळतात. या युवकाने 2019 मध्ये पास्ता तयार करतानाचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.

नॉर्थ कॅरोलिनामधील रहिवासी असलेल्या गियानलुंकेचे टिकटॉकवर सध्या दीड कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. पहिला व्हिडीआ पोस्ट केला, त्यावेळी तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता आणि याचबरोबरीने आपल्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. यादरम्यान त्याने एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळताच त्याचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला. पुढे फॉलोअर्स इतके वाढत गेले की, चेस, कोका कोला आणि डोअरडॅशसारख्या कंपन्यांनी त्याच्याशी जाहिरातींचे करार केले आणि यामुळे तो कोट्यधीश बनत गेला.

Back to top button