गायीची ढेकर, गॅसपासून बनवले जात आहेत हिरे! | पुढारी

गायीची ढेकर, गॅसपासून बनवले जात आहेत हिरे!

लंडन : गायीची ढेकर किंवा पोटातून निघणार्‍या वायूपासून हिरे बनवले जाऊ शकतात याची तुम्हाला कल्पना होती का? आता हे काम केले जात आहे! ‘आयपॉड’चा शोध ज्यांनी लावला, त्या टोनी फॅडेल यांनी अशा मार्गाने हिरे बनवण्यास सुरुवात केली आहे. हा माणूस ‘थ्री इडियटस्’च्या रँचोसारखाच वेगवेगळे प्रयोग करणारा आहे. आता त्याने गायीची ढेकर व गॅस यांच्यामधून निघणार्‍या मिथेन वायूचे रूपांतर हिर्‍यांमध्ये करण्याचा मार्ग शोधला आहे. या हिर्‍यांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही होत आहे.

टोनी फॅडेल यांनी ब्रातिस्लावामध्ये स्टार्मस् फेस्टिव्हलदरम्यान आपल्या नवीन प्रयोगाची माहिती दिली. ते म्हणाले की, बर्‍याच वर्षांपासून त्यांनी कोट्यवधी अशी उत्पादने बनवली, ज्यांचा सध्या लोक वापर करीत आहेत. पण आता आपण जास्तीत जास्त वेळ पृथ्वीची मदत करण्यासाठी करीत आहे! मिथेन जास्त कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी याचवर्षी मिथेनसॅट नावाचा एक उपग्रह लाँच करण्यात आला होता. त्यासाठी मी पैसे दिले. त्याचे डिझाईन आणि निर्मिती आमच्या टीमने केली. आम्हाला पृथ्वीला वाचवायचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,

सध्या आम्ही गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणार्‍या मिथेनपासून हिरे बनवत आहोत. यामध्ये भरपूर मिथेन असते, जे आम्ही गोळा करीत आहोत. माझी ‘डायमंड फौंड्री’ नावाची कंपनी आहे. आम्ही एक तर गायींपासून किंवा जमिनीतून बायोमिथेन घेतो. ते आम्ही हरित ऊर्जा, पवन आणि सौर ऊर्जा हिर्‍यात रूपांतर करतो. कार्बन डायऑक्साईडप्रमाणेच मिथेनमध्येही कार्बनचे अणू असतात, जे कंपनी हिरे बनवण्यासाठी बाजूला करते. आता या हिर्‍यांचा वापर मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये केला जात आहे. मिथेनमुळे पृथ्वीचे तापमान वाढते व त्यामुळे त्याचे वातावरणातील उत्सर्जन कमी करणे गरजेचे आहे.

Back to top button