MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार आणि सहकारातील आदर्श नेतृत्व | पुढारी

MLA P N Patil | आमदार पी. एन. पाटील : काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार आणि सहकारातील आदर्श नेतृत्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार आणि सहकारातील आदर्श नेतृत्व म्हणूनच आमदार पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांची आयुष्यभर ओळख राहिली. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व वसंतरावदादा पाटील यांच्या विकासाच्या कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून आमदार पाटील यांना ओळखले जात होते. आज (दि.२३ ) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

आ. पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कोलहापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदापासून केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार आणि राजकारण या दोन्हींचा समन्वय साधला, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील ते पददलित लोकांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या जीवनात उन्नती निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये जे प्रयत्न केले, ते निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक सहकारातील जाणकार नेतृत्व म्हणून एक आदर्श निर्माण करणारे आहेत.

पी. एन. पाटील आणि निष्ठा यांचे अतूट नाते

पी. एन. पाटील आणि निष्ठा यांचे अतूट नाते आहे. चाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कधीही आपल्या तत्त्व व निष्ठेशी तडजोड केली नाही. काँग्रेस पक्ष आणि गांधी-नेहरू घराणे त्यांच्या नसानसात भिनलेले आहे. राजकीय कारकीर्दीत अनेकदा अपयश पत्करावे लागले. मात्र, त्यांनी कधीही पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही. १९९९ साली काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले. तेव्हा जिल्ह्यात पक्षाची अवस्था गलितगात्र झाली होती. मात्र, सलग वीस वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. जिल्हाध्यक्षपदाची धुरा प्रदीर्घकाळ सांभाळणारे देशातील एकमेव नेते आहेत. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याला ताकद देऊन संघटना मजबूत करण्याचे आणि टिकवण्याचे काम त्यांनी केले. राजकारण हे केवळ राजकारणासाठी अथवा फायद्यासाठी न करता सर्वसामान्य जनतेचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेले पी. एन. पाटील म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक तपस्वीच होते.

सहकारातील आदर्श नेतृत्व

सहकारामध्ये काम कशा पद्धतीने करावे आणि सहकार टिकून सर्वसामान्य माणूस गाव पातळीवरील गावगाड्यातील माणूस, शेतकरी कुटुंबातील, सर्व लोक एकत्रितपणे सामान्यपणे जीवन जगणारी माणसं आपल्या आयुष्यामध्ये एकसंघ कशी राहतील? यासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत, ते निश्चितच अत्यंत मोलाचे असे आहेत. पी. एन. पाटील (MLA P.N.Patil) हे सहकारामध्ये आदर्श निर्माण केलेले नेतृत्व आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांनी चेअरमन असताना सभासदांना आणि सर्व शेतक-यांना बँकमार्फत दिले जाणारे शेतीसाठी कर्ज हे संपूर्ण देशामध्ये सहा टक्के एवढ्या कमीत कमी अल्प व्याजदराने देण्याचे धाडस पी. एन. पाटील यांनी या लोकांसाठी केले.

सहकारातील त्यांच्या कामासंबंधी जेवढे आपल्याला लिहिता येईल ते कमीच होईल. कारण त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये ज्या सहकारी संस्थांची स्थापना केली त्यामध्ये श्रीपतरावदादा सहकारी बँक, निवृत्ती तालुका संथ असेल किंवा राजीवजी सहकारी सूतगिरणी असेल यांच्या माध्यमातून एक वेगळा असा आदर्श सहकारामध्ये त्यांनी निर्माण केला. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भोगावती सहकारी साखर कारखान्याची चेअरमनपदाची धुरा त्यांनी सांभाळली या चेअरमनपदाच्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन त्या सभासदांच्या हितासाठी काय करू शकतो, याचा एक आदर्श ‘भोगावती ‘च्या माध्यमातून त्यांनी निर्माण केला.. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी सभासदांची ऊस बिलाची रक्कम असेल, तोडणी ओढणी वाहतुकीची बिले असतील किंवा व्यापाऱ्यांची देणी असतील, या सर्व सोयी त्यांनी सातत्याने चालू ठेवण्याराठी प्रचंड काटकसर केली. नियोजनबद्ध कारभार करून सहकारामध्ये एक वेगळेपण आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज सहकार क्षेत्रावर वेगळ्या अर्थाने टीका-टिपणी केली जाते. मात्र, पी. एन. पाटील यांनी कर्तुत्वाने सहकार क्षेत्राला एक वेगळा चेहरामोहरा दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button