जिल्हा परिषद भरती: आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षा जूनमध्ये | पुढारी

जिल्हा परिषद भरती: आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षा जूनमध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली होती. अखेर आरोग्यसेवक, ग्रामसेवक या पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, संबंधित परीक्षा जून महिन्यातच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्यसेवक, ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्यात. परंतु, उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान 30 दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती. परीक्षेसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा 10 जून ते 15 जूनदरम्यान घेण्यात येणार आहे. आरोग्यसेविका या पदासाठी 16 जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे, तर ग्रामसेवक या पदासाठी 16 ते 21 जूनदरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक या पदासाठी 1 लाख 75 हजार 636 उमेदवार परीक्षा देणार आहेत. आरोग्यसेविका या पदासाठी 27 हजार 818 महिला उमेदवार परीक्षा देणार आहेत, तर ग्रामसेवक या पदासाठी 1 लाख 35 हजार 171 उमेदवार परीक्षा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदांसाठी मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज
भरून चार महिने लोटल्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर आता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद विभागातील अनेक पदांची परीक्षा पार पडली. परंतु, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांच्या परीक्षा ‘पेसा’ आरक्षणामुळे राखडल्या. उर्वरित परीक्षा लवकर घ्याव्यात म्हणून आम्ही वेळोवेळी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करीत होतो. आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.

– महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

हेही वाचा

Back to top button