भीमा नदीत बुडालेले सहा जण बेपत्ताच; ‘एनडीआरएफ’च्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम | पुढारी

भीमा नदीत बुडालेले सहा जण बेपत्ताच; ‘एनडीआरएफ’च्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणातील भीमा नदीपात्रामध्ये मंगळवारी (दि. 21) संध्याकाळी 6 च्या सुमारास 7 प्रवासी घेऊन निघालेली बोट पाण्यात बुडाली. त्यातील एकाने पोहोत काठ गाठला व जीव वाचवला. मात्र, उर्वरित 6 प्रवासी अद्यापही बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरूच आहे. गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग ऊर्फ गोल्या ज्ञानदेव अवघडे (वय 20) व गौरव धनंजय डोंगरे (वय 25) अशी बुडाल्यांची नावे आहेत.

बुधवारी (दि. 22) सकाळी एनडीआरएफच्या 20 जणांच्या पथकाने उजनी जलाशयात शोध कार्याला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर महसूल, पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक हेदेखील शोधकार्यात सहभागी झाले. बुधवारी दिवसभर शोधाशोध करूनही त्यास यश आले नाही. बोटीमध्ये उगाव येथून कळासीला येताना दुचाकीदेखील बोटीत ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक दुचाकी (क्र. एमएच 45 एजे 2236) पाण्याबाहेर काढण्यात आली. बुधवारी दिवसभराचे शोधकार्य सायंकाळी अडथळा येत असल्याने थांबवण्यात आले. गुरुवारी (दि. 23) पुन्हा ही शोधमोहीम सुरू केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचविला असला, तरी ते बुधवारी सकाळपासून स्वतः या शोध कार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळ दाखवून मदत करत होते.

दरम्यान, सकाळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत घडलेली घटना दुर्दैवी असून, बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सूचना केल्या. प्रशासनाच्या वतीने बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी सचिन खुडे हे घटनास्थळी तळ ठोकून होते. करमाळ्याच्या प्रांताधिकारी ज्योती आंबेकर व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी भेट देऊन माहिती घेत स्वतः बोटीमध्ये बसून तपासाबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, उजनीपात्राच्या दुसर्‍या बाजूलाही करमाळा तालुक्यातील बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक यांची सतत गर्दी पाहायला मिळत होती. तसेच कळाशी गावातही इंदापूर तालुक्यातील बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली.

 दि. 1 मे 2017 च्या दुर्दैवी घटनेला उजाळा

इंदापूर तालुक्यातील उजनी बॅक वॉटर परिसरात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहा डॉक्टर दि. 1 मे 2017 रोजी पर्यटनासाठी आले होते. त्यापैकी 4 डॉक्टरांवर नियतीने घाला घातला होता. रविवारच्या सायंकाळी जोरदार वार्‍यामुळे आणि बोटीत सेल्फी काढण्याच्या नादात होडी नदीत बुडाल्याने डॉ. सुभाष मांजरेकर, डॉ. अण्णा शिंदे, डॉ. चंद्रकांत उराडे आणि डॉ. महेश लवटे या चार जणांना जीव गमवावा लागला. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांनी ही दुर्घटना घडल्यानंतर तत्परता दाखवत शोधमोहीम राबवली. या दुर्घटनेच्या निमित्ताने नदीतून प्रवास करताना होडीतील एकाही व्यक्तीने जॅकेट, ट्युब किंवा इतर सुरक्षिततेची दक्षता न घेतल्याने त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचे समोर आले होते. मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर या घटनेला उजाळा मिळाला.

दीडशे फूट ओढूनही बोट निघाली नाही

भीमा नदीपात्रात ज्या ठिकाणी बोट बुडाली त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 फूट पाणी होते. इतर बोटींच्या साहाय्याने बुडालेली बोट काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास 150 फूट अंतरापर्यंत बोट ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोट नदीपात्राच्या काठावर आणण्यात यश आले नाही. सूर्य मावळल्यानंतर दिवसभर सुरू असलेले मदतकार्य थांबविण्यात आले होते. मदतकार्य थांबवेपर्यंत काहीही हाती लागले नव्हते.

हेही वाचा

Back to top button