आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक होणार निवृत्त | पुढारी

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक होणार निवृत्त

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ या दशकाच्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला त्याच्या कक्षेतून हटवण्याची तयारी करीत आहे. यामुळे पृथ्वीच्या खालील कक्षेत फिरत असलेले हे अंतराळ स्थानक नष्ट होईल. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ‘आयएसएस’ने आपले आयुष्य पूर्ण केले असून भविष्यातील संशोधनासाठी अधिक अद्ययावत अशा अंतराळ स्थानकाची गरज आहे. त्यामुळे सध्याच्या निवृत्त होत असलेल्या अंतराळ स्थानकाला समुद्रात क्रॅश करून ते नष्ट केले जाईल.

‘नासा’ने या अंतराळ स्थानकाला हटवण्यासाठी यूएस डोरबिट व्हेईकल (यूएसडीव्ही) च्या विकासासाठीचा एक प्रस्ताव जारी केला आहे. हे एक असे अंतराळ यान आहे जे ‘आयएसएस’ला सुरक्षितपणे डीऑर्बिट करील. त्यासाठी त्याचे खास डिझाईन करण्यात आले आहे. ‘यूएसडीव्ही’ला ‘आयएसएस’ची सुरक्षित आणि नियंत्रित डिकमीशनिंग निश्चित करण्यासाठी रणनीतीचा एक महत्त्वपूर्ण घटक बनवण्याची योजना आहे. नोव्हेंबर 2000 पासून आतापर्यंत या अंतराळ स्थानकावर विशिष्ट कालावधीनंतर वेगवेगळ्या देशांचे अंतराळवीर संशोधनासाठी राहत आले आहेत.

‘आयएसएस’ला नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, कॅनेडियन स्पेस एजन्सी आणि रशियाच्या रॉसकॉसमॉसने एकत्रितपणे विकसित केले आहे. ते 1998 पासून सातत्याने संचालित राहिलेले आहे. भागीदार देशांनी त्याला 2030 पर्यंत संचालित करण्यास सहमती दर्शवली आहे. रशियाने किमान 2028 पर्यंत या स्थानकाशी संबंधित काम करण्यास प्रतिबद्धता दर्शवली आहे. हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 410 किलोमीटर वरून प्रदक्षिणा घालत आहे. 4,19,725 किलो वजनाचे हे स्पेस स्टेशन पृथ्वीवरील समुद्रात क्रॅश करणे हे सहज सोपे काम नाही. त्याची सध्याच्या कक्षेतील उंची हळूहळू कमी करीत हे काम करावे लागणार आहे, जेणेकरून जानेवारी 2031 पर्यंत ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकेल.

Back to top button