कच्चा कांदा खा; आरोग्य चांगले ठेवा! | पुढारी

कच्चा कांदा खा; आरोग्य चांगले ठेवा!

नवी दिल्ली : गरिबांचे अन्नि म्हणजे कांदा-भाकर. कांदा केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. विशेषतः उन्हाळ्यात कच्च्या कांद्याचे जास्तीत जास्त सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. कच्चा कांदा प्रत्येक घरात सहज मिळेल. तो खाण्यासाठी तिखट असला तरी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कच्च्या कांद्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी-6, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम इत्यादी आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कांदा अनेक समस्या दूर करू शकतो. कांद्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या…

कच्च्या कांद्यामध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. कांदा रोज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसपासून आराम मिळतो. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते. यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात. कच्चा कांदा खाल्ल्याने सांधेदुखी, दमा इत्यादींपासून आराम मिळतो.

कांदा किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा आणि मूत्रप्रक्रियेसाठी खूप फायदेशीर आहे. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर असते, जे मेंदूसाठी फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता दोन्ही वाढते. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर सर्वाधिक प्रमाणात असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने हाडे निरोगी राहतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासही मदत होते. याशिवाय हे उष्माघातापासूनही आपले संरक्षण करते.

Back to top button