कैरी असते आरोग्यदायी गुणांचा खजिना | पुढारी

कैरी असते आरोग्यदायी गुणांचा खजिना

नवी दिल्ली : ॠतुमानाप्रमाणे येणारी हंगामी फळे खाणे हे नेहमीच आरोग्यासाठी लाभदायक ठरत असते. उन्हाळ्याचे दिवस येताच अनेकजण आंब्यावर ताव मारतात. उन्हाळ्याचे तीन महिनेच हे फळ बाजारात मिळत असल्याकारणाने सगळेच लोक या दिवसात मिळेल तितका आंबा खाऊन घेतात. मात्र, आंबा हा उष्ण पदार्थ असल्यामुळे तो खाल्ल्यावर अनेकांच्या आरोग्याबाबतीत तक्रारी येऊ लागतात. अशावेळी आंबा नव्हे तर कच्ची कैरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.

कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते. पण ती आंबट असल्याने दात आंबतात, खोकला लागतो असे अनेकांना होते. त्यामुळे कच्ची कैरी खायला अनेकजण टाळतात. मात्र, कैरी खाण्याचे फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत असली तर त्याचे आरोग्याला काहीही साईड इफेक्ट होत नाही. कैरीमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. व्हिटॅमिन ‘सी’मुळे इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. कैरीमध्ये व्हिटॅमिन ‘बी’ आणि फायबर असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्तसंचार योग्य पद्धतीने होतो. परिणामी, हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कैरी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच प्रेग्नन्सी मॉर्निंग सीकनेस आणि मळमळ जाणवत असेल, तरीदेखील महिला कैरी खाऊ शकतात. कैरीमध्ये आढळणारे झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करते. जर तुम्हाला कच्ची कैरी खाणं आवडत नसेल तर तुम्ही कैरीचे पन्ह, डाळ कैरी, कैरीची चटणी अशा पद्धतीने कैरीचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे दात आंबणे आणि खोकल्याचा त्रास उद्भवणार नाही, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

Back to top button