वधू हसेतोवर नोटा उधळण्याची प्रथा! | पुढारी

वधू हसेतोवर नोटा उधळण्याची प्रथा!

लागोस : विवाह सोहळा हा कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यातील सर्वात मोठा इव्हेंट असतो. प्रत्येक धर्मात विवाहाच्या वेगवेगळ्या पद्धती, रीतीरिवाज असतात. यातील काही रीतीरिवाज तर वर्षांनुवर्षे चालत आले आहेत. बाहेरील देशातही आपल्यापेक्षा वेगवेगळ्या चालीरीती दिसून येतात. नायजेरियातील एका विवाह सोहळ्यात मात्र चाकोरीच्या पलीकडील एक पद्धत एका व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाली असून यात नववधू हसेतोवर वराला तिच्यावर नोटा उधळत रहावे लागते! एकदा नववधू हसली की तिथे त्याला हे नोटांचे उधळणे थांबवता येते.

नायजेरियात नववधू विवाह सोहळ्यासाठी तयार होऊन वरासमोर येते, त्यावेळी तिला साधे स्मित हास्य करण्याचीही परवानगी नसते. तेथे नववधू अतिशय गंभीर मुद्रेत वरासमोर येते आणि वराला यावेळी तिच्या चेहर्‍यावर स्मित हास्य झळकेपर्यंत नोटांची उधळण करावी लागते. ज्यावेळी नववधूला असे वाटते की, उधळलेले पैसे तिच्यासाठी बरेच आहेत, तेव्हा ती स्मित हास्य करते.

सोशल मीडियावर हा रीवाज एका व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नियोजित वर नोटांची बरीच उधळण करत असतानाही नववधू स्तब्ध असल्याचे आणि नंतर बर्‍याच वेळेनंतर ती स्मित हास्य करत असल्याचे दिसून येते. नववधू आपल्याला पसंत असून तिच्यासाठी आपण काहीही करू शकतो, असे वराला यातून सुचवायचे असते, असा या रीतीरिवाजामागील अर्थ असल्याचे सांगितले जाते.

Back to top button