कारने 116 देश फिरण्याचा ‘कार’नामा! | पुढारी

कारने 116 देश फिरण्याचा ‘कार’नामा!

न्यूयॉर्क : जगभर प्रवास करणे जवळपास प्रत्येकाला आवडेल. पण, काही लोक याचाच ध्यास घेत पूर्ण आयुष्य त्यासाठी वेचण्यासही कमी-जास्त करणार नाहीत. जेम्स रॉजर्स व पेज पार्कर ही अशीच एक जोडगोळी असून, जगभर फिरण्याच्या ध्यास घेत त्यांनी कारने चक्क 116 देश पालथे घातले आहेत. आजवर असा ‘कार’नामा अन्य कोणालाही करता आलेला नसून, या जोडीची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

या जोडीने 1 जानेवारी 1999 रोजी आपल्या प्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी त्यांच्याकडे हार्ड टॉप कन्व्हर्टिबल कार होती. या पती-पत्नीने पनामापासून जपानपर्यंत असा एकही देश सोडला नाही, जिथे पाऊल ठेवायचे बाकी रहावे. जंगल, वाळवंटे, सीमारेषा पार करत अगदी युद्धज्वराने पछाडलेल्या देशालाही त्यांनी भेटी दिल्या.

पहिली तीन वर्षे तर ते अव्याहतपणे प्रवास करत राहिले. यादरम्यान त्यांनी जवळपास 2 लाख 45 हजार किलोमीटर्सचे अंतर कापले. या प्रदीर्घ प्रवासात त्यांच्यासमोर अनेक अडचणी येत राहिल्या. खाण्यापिण्याची बर्‍याचदा आबाळ झाली; पण तरीही त्यातून त्यांनी मार्ग काढत हा प्रवास पूर्णत्वास नेला.

Back to top button