1700 वर्षांपूर्वीच्या मनोर्‍याचा स्वित्झर्लंडमध्ये लागला शोध | पुढारी

1700 वर्षांपूर्वीच्या मनोर्‍याचा स्वित्झर्लंडमध्ये लागला शोध

बर्न : उत्तर स्वित्झर्लंडमधील र्‍हाईन नदीच्या काठावर संशोधकांना एका रोमनकालीन मनोर्‍याच्या अवशेषांचा शोध लागला आहे. टेहळणीसाठी बनवण्यात आलेला हा मनोरा इसवी सनाच्या चौथ्या शतकातील आहे. त्याचा चौथरा 23 फूट लांब आणि 23 फूट रुंदीचा आहे. त्याच्या भिंतीची जाडी तीन फुटांची आहे. हा मनोरा एकेकाळी किती उंचीचा होता, हे समजू शकलेले नाही.

पुरातत्त्व संशोधकांना या मनोर्‍याच्या विटा, दगड, छताच्या लाद्या आणि पाया काढण्यासाठी खोदलेला खड्डा आढळून आला आहे. स्वित्झर्लंडमधील श्लाट शहराजवळ हे उत्खनन करण्यात आले. हे ठिकाण रोमन काळातील सैन्य तळाचे असावे असे संशोधकांना वाटते. या ठिकाणी एक रोमन नाणेही सापडले आहे. ते सम्राट कॉन्स्टॅन्टाईनच्या काळातील म्हणजेच इसवी सन 306 ते 336 या काळातील आहे.

या मनोर्‍यामध्ये पाच ते पंधरा लोक राहू शकत होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. अर्थात, हे सर्वच लोक सैनिक नव्हते. हॅन्सजोर्ग ब्रेम या संशोधकाने याबाबतची माहिती दिली. गोथ, व्हँडाल व हुण यांच्यासारख्या हिंसक आक्रमकांना रोखण्यासाठी रोमन सम्राट उत्तरेकडील सीमेवर विशेष लक्ष ठेवून असायचे. त्यामुळेच अशा पद्धतीचे टेहळणीचे मनोरे बांधले गेले होते.

Back to top button