वाघाची एक डरकाळी अन् फोटोसेशनचा ‘द एन्ड’! | पुढारी

वाघाची एक डरकाळी अन् फोटोसेशनचा ‘द एन्ड’!

बँकॉक : जेथे जाईल तेथे सेल्फी घ्यायचे, फोटो घ्यायचे, स्वत:चा अतिरुबाब दाखवायचा ही अनेकांना सवय असते. विशेषत: जिथे साहस दाखवण्याची संधी असते, तिथे अशी खुमखुमी हमखास बाहेर पडते. पण, काही वेळा याची किंमत कशी मोजावी लागेल, हे कोणीही सांगू शकत नाही. थायलंडमधील दोन-तीन पर्यटकांना फोटोसेशन करत असताना अचानक असाच गर्भगळित करून टाकणारा अनुभव आला आणि वाघाच्या एका डरकाळीने फोटोसेशन सोडून त्यांना तेथून पळ काढावा लागला.

थायलंडला कोणी गेले की, तिथे वाघ व अन्य प्राण्यांसह बरेच जण फोटोसेशन करतात. हा सारा खटाटोप सोशल मीडियावर झळकण्यासाठीच असतो. आता हे प्राणी साखळदंडाने जरुर बांधलेले असतात. पण, शेवटी असतात जंगलीच! कधी एखादा मनुष्य टप्प्यात आला, तर ते झडप घालण्यातही कसर सोडणार नाहीत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत असेच दिसून आले असून यात साखळदंडात बांधलेला वाघ आपल्या जागी बसून होता आणि दोघे पर्यटक त्याच्यासमवेत फोटो काढून घेत होते.

यादरम्यान एक तिसरी व्यक्ती वाघाला काठीने हुसकवण्याचा प्रयत्न करत होती. याला कंटाळून वाघाने अचानक कानठळ्या बसवणारी डरकाळी फोडली आणि हे तिन्ही पर्यटक तिथून कधी पसार झाले, हे त्यांना स्वत:लाही कळले नाही. फक्त डरकाळीनेच पाचावर धारण बसलेल्या या तीन पर्यटकांना तो वाघ साखळदंडाने बंदिस्त नसता, तर काय झाले असते, ही कल्पनाच आयुष्यभर छळत राहील.

Back to top button