आशियात हत्तींचे दोन तृतीयांश अधिवास क्षेत्र संपुष्टात | पुढारी

आशियात हत्तींचे दोन तृतीयांश अधिवास क्षेत्र संपुष्टात

कॅलिफोर्निया : मागील कित्येक वर्षांपासून सातत्याने चालत आलेली जंगलतोड, वाढती शेती व सर्वसाधारण सेवासुविधा उभी करण्यासाठी होणारे अतिक्रमण यामुळे हत्तींचे आशियातील अधिवासाचे क्षेत्र थोडेथोडके नव्हे तर 64 टक्के अर्थात दोन तृतियांश अधिवास क्षेत्र संपुष्टात आले आहे. आशियातील 13 देशांमध्ये आशियाई हत्ती आढळून येतात. सध्या जगभरात आशियाई हत्तींची संख्या 50 हजारांहून कमी झाली आहे.

जर्नल सायंटिफिक रिपोर्टमध्ये प्रसिद्ध एका अहवालानुसार, 1700 सालापासून आशियातील हत्तीसाठी उपयुक्त असणारे 64 टक्के अधिवास क्षेत्र नष्ट झाले आहे. अधिवास क्षेत्रच नष्ट होत असल्याने अशा हत्तींचे कळप मानवी वस्तीत घुसतात व अशा परिस्थितीत संघर्ष वाढणे साहजिकच असते. अधिवास क्षेत्रात घट होण्याच्या निकषावर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये हत्ती अधिवासाच्या क्षेत्रात चक्क 94 टक्के घट झाली आहे.

भारताबरोबरच बांगला देश, थायलंड, व्हिएतनाम व इंडोनेशियातील सुमात्रा येथेही हत्तींची 50 टक्के अधिवास क्षेत्रे या ना त्या कारणाने नष्ट झाली आहेत. भूतान, नेपाळ, श्रीलंका येथेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अधिवास क्षेत्र घटत चालल्यानंतर हत्तींचा कळप केव्हा ना केव्हा मानवी वस्तीत घुसतो आणि त्यानंतर कसे नुकसान होते, याचा उत्तम दाखला 2021 मध्ये चीनने अनुभवला आहे. चीनमधील युन्नान प्रांतातून पलायन केलेल्या हत्तीच्या कळपाने 500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापताना स्थावर, शेतीचे नुकसान केले आणि नुकसानीचा आकडा 800 कोटींवर पोहोचला होता. भारतात रेल्वेचे अपघात, घटत चाललेले जंगली क्षेत्र आणि विजेच्या तार्‍यात अडकल्याने हत्तींची संख्या बरीच कमी होत चालली आहे.

Back to top button