सुंदर पिचाईंचे वेतन कर्मचार्‍यांच्या तुलनेत 800 पट अधिक | पुढारी

सुंदर पिचाईंचे वेतन कर्मचार्‍यांच्या तुलनेत 800 पट अधिक

न्यूयॉर्क : जगभरातील अनेक बड्या कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय वंशाचे नागरिक आहेत. त्यामध्येच ‘गुगल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश होतो. त्यांनी 2022 मध्ये सुमारे 19 अब्ज रुपये कमावले आहेत. स्टॉक अ‍ॅवॉर्डस्च्या रूपाने त्यांना यातील बहुतेक भाग मिळाला. कंपनीने एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये सुंदर पिचाई यांना 226 मिलियन डॉलर (1854 कोटी रुपये) पगार मिळाला आहे. कंपनीत काम करणार्‍या सामान्य कर्मचार्‍याच्या उत्पन्नापेक्षा हे 800 पट जास्त आहे. विशेष म्हणजे यंदा जानेवारीमध्ये गुगलने 12,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

मीडिया रिपोर्टस्नुसार, सुंदर पिचाई यांना अनेक उत्पादनांचे यशस्वी लाँचिंग आणि सीईओ पदावर बढती दिल्याबद्दल ही मोठी रक्कम पगार म्हणून देण्यात आली आहे. त्यांचा पगार जास्त प्रमाणात दिसत आहे. कारण, त्यांच्याकडे सुमारे 218 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 17.88 अब्ज रुपयांचा स्टॉक अ‍ॅवॉर्ड आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गुगलने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि यू ट्यूब व्यवसायातून नफा कमावला.

यावेळी कंपनीने मशिन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. सुंदर पिचाई हे सर्वाधिक वेतन घेणार्‍या अधिकार्‍यांमध्ये आहेत. भारतीय वंशाचे पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. गुगलने जानेवारी महिन्यात 12,000 लोकांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचा परिणाम जगभरातील गुगलच्या कार्यालयांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर झाला.

याशिवाय गुगल ऑफिसेस खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करीत आहे. छाटणीबाबत सुंदर पिचाई म्हणाले होते की, कंपनीसाठी हा कठीण पण योग्य निर्णय आहे. पुढील रणनीती लक्षात घेऊन हे केले जात असल्याचे ते म्हणाले होते.

Back to top button