पहिला ‘स्मार्टफोन’ बनवणारा माणूस! | पुढारी

पहिला ‘स्मार्टफोन’ बनवणारा माणूस!

वॉशिंग्टन : पहिल्यावहिल्या गोष्टींना बरेच महत्त्व असते. विजेचा दिवा, रेडिओ, टिव्ही यांपासून ते कॉम्प्युटरपर्यंतच्या अनेक वस्तू ज्या आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत, त्यांची सुरुवातीची रूपं आजही आपल्याला आकर्षित करतात. सध्याचे युग स्मार्टफोनचं आहे. स्मार्टफोनने सारं जग आणि जगातल्या बहुतांश जणांचं विश्व व्यापून टाकलं आहे. त्यामुळेच त्याला अत्यंत शक्तिशाली उपकरण असं म्हटलं जातं. मोबाईल फोन अर्थात सेलफोनचा शोध मार्टिन कूपर यांनी लावला. त्यांना ‘फादर ऑफ सेलफोन’ असं म्हटलं जातं. आज 94 वर्षांचे असलेल्या कूपर यांनी फोनच्या वाढत्या वापराबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

शिकागोमध्ये राहणार्‍या कूपर यांनी 1950 साली इलिनॉईस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर सात वर्षांनी त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. 1970 च्या दशकात अमेरिकेत कारमध्ये फोन नावाची संकल्पना अस्तित्वात होती. ते डिव्हाईस वाहनांच्या बॅटरीशी जोडलं जाई आणि रेडिओ चॅनेलच्या माध्यमातून आऊटगोईंग कॉल केले जात होते; मात्र आजच्या काळात फोन वापरणं जितकं सोपं आहे, तितका त्या काळातला फोनचा वापर सोपा नव्हता.

कारमधील हा फोन माणसाच्या हातात पोहोचावा, असं स्वप्न मार्टिन कूपर यांनी पाहिलं. त्या कल्पनेवर त्यांनी काम केलं आणि वायरलेस डिव्हाईस तयार केलं. त्याचं नाव होतं ‘मोटोरोला डायनाटीएसी 8000एक्स.’ त्यानंतर 3 एप्रिल 1973 पासून त्याचा वापर कॉल करण्यासाठी केला जाऊ लागला. पहिला कॉल त्या माध्यमातून केला गेल्यानंतर सेलफोनच्या क्रांतीची सुरुवात झाली.

साहजिकच तो ऐतिहासिक क्षण होता. त्याचं कमर्शियल व्हर्जन तयार करण्यासाठी कूपर यांनी मेहनत केली आणि ती यशस्वी झाली. त्यांनी जो ओरिजिनल सेलफोन तयार केला होता, त्याचं वजन 1.1 किलो होतं, त्याची लांबी 11 इंच होती आणि त्यावर लांब अँटिनासुद्धा होता. तिथपासून नवनवं संशोधन होऊन, तंत्रज्ञान विकसित होऊन आजचा फोन स्मार्ट आणि आकाराने एकदम छोटा, सहज बाळगता येण्यासारखा झाला आहे. पण आजच्या फोनने अनेक आव्हानं उभी केली आहेत, असं मार्टिन कूपर यांनी म्हटलं आहे.

Back to top button