छोट्या तार्‍याभोवती फिरणार्‍या मोठ्या ग्रहाचा शोध | पुढारी

छोट्या तार्‍याभोवती फिरणार्‍या मोठ्या ग्रहाचा शोध

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे 280 प्रकाशवर्ष अंतरावरील एका मोठ्या आकाराच्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह एका असामान्य रूपाने छोट्या आकाराच्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. अर्थातच हा तारा ग्रहाच्या तुलनेने मोठाच आहे, मात्र त्यांच्या आकारात फारसा फरक नाही. या ग्रहाला संशोधकांनी ‘टीओआय 5205 बी’ असे नाव दिले आहे.

हा ग्रह आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूइतक्या आकाराचा आहे. त्याचा तारा केवळ चार पटीने अधिक मोठा आहे. ‘नासा’च्या ‘ट्रांजिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ (टेस) या दुर्बिणीचा वापर करून हा ग्रह शोधण्यात आला. ‘टेस’ला 2018 मध्ये बाह्यग्रहांच्या शोधासाठी पाठवण्यात आले होते. ही दुर्बिण जवळच्या सर्वात चमकदार तार्‍यांच्या प्रकाशाचे सर्व्हेक्षण करते. त्यामधूनच हे समजते की या तार्‍याभोवती एखादा ग्रह फिरत आहे की नाही. ‘टेस’ मोहिमेतून हजारो संभाव्य ग्रहांचा छडा लागलेला आहे. आता तिने ज्या ग्रहाला शोधले आहे तो ‘टीओआय-5205’ नावाच्या एका खुजा लाल तार्‍याभोवती फिरतो. त्याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या केवळ 40 टक्के इतकेच आहे. आपल्या सूर्याचे तापमान 5527 अंश सेल्सिअस आहे तर त्याचे तापमान 3127 अंश सेल्सिअस आहे.

Back to top button