ब्रह्मांडाच्या नकाशात झाली आणखी वाढ | पुढारी

ब्रह्मांडाच्या नकाशात झाली आणखी वाढ

वॉशिंग्टन : अंतराळातील आजपर्यंतचा जो सर्वात मोठा 2 डी नकाशा होता, त्याचा आकार आता आणखी वाढला आहे. आता तो पृथ्वीच्या जवळजवळ निम्म्या आकाशाला ‘कव्हर’ करीत आहे. ‘नॅशनल रेडियो ऑप्टिकल अ‍ॅस्ट्रोनॉमी ऑब्झर्व्हेटरी’नुसार ब्रह्मांडाच्या सहा वर्षांच्या सर्वेक्षण डेटाच्या माध्यमातून हा नकाशा बनवण्यात आला आहे. या नकाशात एक अब्जपेक्षाही अधिक चमकदार ठिपके आहेत, जे आकाशगंगा दर्शवतात आणि त्यामध्ये अब्जावधी तारे आहेत. या मॅपचा विस्तार ‘डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रूमेंट लिगेसी इमेजिंग सर्व्हे’कडून जारी दहाव्या डेटाच्या साहाय्याने झाला आहे.

या प्रोजेक्टचे लक्ष्य 4 कोटी गॅलेक्टिक टार्गेटची ओळख करणे हे आहे. त्याचा वापर 12 अब्ज वर्षांमध्ये ब्रह्मांडाच्या विस्ताराच्या इतिहासाला अचूकरीत्या ‘मॅप’ करण्यासाठी केला जाऊ शकतो. या योजनेच्या अखेरीस वैज्ञानिक डार्क एनर्जीलाही समजून घेऊ इच्छितात. ब्रह्मांडाची एकूण ऊर्जा आणि पदार्थाचा एक मोठा हिस्सा डार्क एनर्जी आहे; मात्र तरीही त्याविषयीची अत्यंत कमी माहिती विज्ञानाला आहे. या गॅलेक्टिक टार्गेट्सना आधीच मोठ्या प्रमाणात 2 डी मॅपिंगसाठी निवडण्यात आले आहे.

मात्र तरीही वैज्ञानिकांनी सर्वात मोठा मॅप बनवण्यासाठी त्याला जोडणे थांबवलेले नाही. आधी संयुक्तरीत्या तीन सर्वेक्षणांच्या डेटाचा वापर करून टेलिस्कोपच्या माध्यमातून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील आकाशाची 14 हजार चौरस अंशाची प्रतिमा टिपली गेली. दहावा डेटा रीलिज झाल्यानंतर आता तो 20 हजार चौरस अंशापर्यंत फैलावला आहे. नव्या डेटासाठी दक्षिण गोलार्धातून प्रतिमा टिपण्यात आली. याशिवाय नव्या डेटामध्ये एक अतिरिक्त फिल्टरसह आकाशाची निअर इन्फ्रारेड प्रतिमाही समाविष्ट आहेत, ज्या माणूस पाहू शकतो.

Back to top button