चंद्रपूर : कच्चेपार कारघाटा जंगलात वाघाच्या हल्ल्यात तरूण ठार | पुढारी

चंद्रपूर : कच्चेपार कारघाटा जंगलात वाघाच्या हल्ल्यात तरूण ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तरूणावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार कारघाटा जंगलात रविवारी (दि.२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. प्रभाकर अंबादास वेठे (रा. डोंगरगाव) असे या तरूणाचे नाव आहे.

सध्या तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तेंदूपत्ता तोडण्याठी जंगलात जातात. त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या संसाराचा गाडा चालविला जातो. आज डोंगरगावातील प्रभाकर वेठे हे येथील वन परिक्षेत्रातील कच्चेपार कारघाटा जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह सिंदवाही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. गावात शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आला आहे. या घटनेनंतर मृत तरूणाच्या कुटुंबियांची वनविभागाने भेट घेत तातडीने पंचवीस हजाराची आर्थिक मदत केली. या घटनेमुळे तेंदुपत्ता तोडण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच तेंदूपत्ता तोडाईसाठी वनविभागाने मजुरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सिंदेवाही तालुक्यात पाच महिन्यांतील तिसरा बळी

सिंदेवाही तालुक्यात काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सरपन गोळा करण्यासाठी गेलेल्या श्रीकृष्णा सदाशिव कोठेवार याच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार जंगलात घडली होती. ४ मे रोजी तेंदुपत्ता आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव येथे घडली होती. ९ मे रोजी एका बिबट्याने अर्चना भास्कर लोखंडे या महिलेवर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर आजच्या घटनेत प्रभाकर देठे यांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. वाघांचे हल्ले सूरू असतानाही वनविभागकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. त्यामुळे वनविभागाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button