सौरऊर्जेने काँक्रिटच्या कचर्‍याच्या रिसायकलिंगचे नवे तंत्र विकसित | पुढारी

सौरऊर्जेने काँक्रिटच्या कचर्‍याच्या रिसायकलिंगचे नवे तंत्र विकसित

नवी दिल्ली : काँक्रिट एक अशी सामग्री आहे जिचा वापर जगभरात बांधकामासाठी केला जात असतो. या सामग्रीसाठी सध्या व्यापक उत्खनन आणि खनन केले जात असते व त्यामुळे पर्यावरणाची क्षती तसेच प्राथमिक खनिज संसाधनांची घटही होत आहे. काँक्रिटसाठी वापरण्यात येणार्‍या वाळूसाठी नद्यांचीही हानी होत आहे. त्यामुळे सध्या बांधकामासाठी वापरण्यात येणार्‍या सामग्रीचे पुनर्चक्रण आणि त्याच्या प्रभावी पर्यायाचा शोध घेतला जात आहे. आता सौरऊर्जेच्या सहाय्याने काँक्रिट अपशिष्टाच्या रिसायकलिंगची नवी पद्धत विकसित करण्यात आली आहे.

आयआयटी मद्रासने ही प्रक्रिया विकसित केली आहे. तोडफोडीतून निर्माण होणार्‍या काँक्रिटच्या ढिगार्‍याचे रिसायकल करण्यासाठीची ही पद्धत आहे. त्यामध्ये सौरकिरणांच्या वापरातून अपशिष्ट काँक्रिटला उष्ण करून त्याचे पुनर्चक्रित काँक्रिट उत्पादनामध्ये रूपांतरण करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. अशा पद्धतीने मिळवलेल्या काँक्रिटची गुणवत्ता यांत्रिक क्रशिंगने मिळालेल्या सामग्रीच्या तुलनेत अधिक असल्याचेही दिसून आले. त्याचे परीक्षण राजस्थानमध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयातील इंडिया वन सोलर थर्मल पॉवर प्लँटमध्ये करण्यात आले.

उच्च दाबावर उत्पन्न वाफेचा उपयोग करून विजेचे उत्पादन करण्यासाठी यामध्ये 770 सौर संकेंद्रक आहेत. हे संयंत्र 2017 पासून सुरू असून सुमारे 25 हजार लोकांच्या समुदायाला योग्य खर्च आणि कमी देखभालीसह वीज प्रदान करते. अपशिष्ट काँक्रिटच्या प्रक्रियेसाठी परीक्षणांमध्ये दोन संकेंद्रकांचा वापर करण्यात आला. हिटिंगसाठी संकेंद्रित सौर ऊर्जेचा वापर केला जातो. त्याच्या मदतीने काँक्रिट कचर्‍याला रिसायकल केले जाते. अशाप्रकारे उच्च गुणवत्तायुक्त पुनर्चक्रित सामग्री मिळते. काँक्रिट अपशिष्टांना संकेंद्रित सौर विकिरणांचा उपयोग करून 550 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक तापमानात गरम केले जाते.

Back to top button