सर्वात मोठ्या पेंग्विनचे सापडले जीवाश्म | पुढारी

सर्वात मोठ्या पेंग्विनचे सापडले जीवाश्म

वेलिंग्टन : संशोधकांनी पृथ्वीवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पेंग्विनचे जीवाश्म शोधून काढले आहे. हा पेंग्विन तब्बल 340 पौंड म्हणजेच 154 किलो वजनाचा होता. 5 कोटी वर्षांपूर्वी हा महाकाय पेंग्विन महासागरांमध्ये वावरत होता. ही पेंग्विनची एक वेगळीच प्रजाती असून तिला आता ‘कुमिमानू फोर्डीसेई’ असे नाव देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवरील नॉर्थ ओटागो येथे या पेंग्विनचे आठ अन्य नमुन्यांसह जीवाश्म सापडले.

अन्य नमुन्यांपैकी पाच जीवाश्म नमुने हे ‘पेट्राडायप्टीस स्टोनहाऊसेई’ या नव्या पेंग्विन प्रजातीचे आहेत. एक जीवाश्म हे तशाच विशालकाय पेंग्विनची नवी प्रजाती असलेल्या ‘कुमिमानू बिसेई’ या प्रजातीचे आहे. दोन नमुने हे अद्याप अज्ञात आहेत. हे जीवाश्म ज्या खडकात आढळले तो 59.5 दशलक्ष ते 55.5 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळातील आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ पॅलिओंटोलॉजी’मध्ये देण्यात आली आहे.

दोन विशालकाय प्रजातींमधील पेंग्विनचे वजन किती असेल याचा अंदाज त्यांच्या हाडांचा आकार आणि घनतेची आधुनिक पेंग्विनशी तुलना करून व्यक्त केलेला आहे. ‘पी.स्टोनहाऊसेई’ पेंग्विन 50 किलो वजनाचे होते. सध्याच्या एम्परर पेंग्विनच्या तुलनेत ते थोडे अधिक वजनाचे आहेत.पेंग्विन हे पक्षीच असले तरी त्यांना उडता येत नाही. त्यांनी आपली उडण्याची क्षमता समुद्रात पोहण्याची क्षमता मिळवण्याच्या प्रयत्नात सुमारे 60 दशलक्ष वर्षांपूर्वी गमावली. हा काळ या नव्या प्रजाती विकसित होण्याच्या जवळचाच आहे.

Back to top button