‘हा’ आहे सर्व जीवांचा पूर्वज? | पुढारी

‘हा’ आहे सर्व जीवांचा पूर्वज?

लंडन : जीवसृष्टीची सुरुवात एकपेशीय सूक्ष्म जीवांपासून झाली असे मानले जाते. कालांतराने बहुपेशीय जीव विकसित झाले. केंद्रक असलेल्या जटील रचनेच्या पेशी कशा विकसित झाल्या हे प्राचीन काळातील जीवाणूंवरून समजून घेता येऊ शकते. आता संशोधकांनी प्रथमच अशा जीवाणूंना प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने विकसित केले आहे. त्यावरून त्यांची अंतर्गत रचना समजू शकेल. अनेक टेंटॅकल्स असलेला विशिष्ट जीवाणू हा सर्व प्रकारच्या जटील जीवनरचनेचा थेट पूर्वज ठरू शकतो असे संशोधकांना वाटते.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधकांनी ‘लोकियार्चियम ओस्सिफेरम’ नावाच्या जीवाणूंना विकसित केले आहे. ‘अ‍ॅसगार्ड आर्चिया’ नावाच्या कुळाशी संबंधित हे जीवाणू आहेत. ‘अ‍ॅसगार्ड आर्चिया’ हे युकॅरिओटस्चे उत्क्रांतीच्या टप्प्यातील जवळचे नातेवाईक असल्याचे काही संशोधकांना वाटते. ‘युकॅरिओटस्’ म्हणजे अशा पेटी ज्या ‘न्यूक्लियस’ म्हणजेच केंद्रकात त्यांचे डीएनए साठवतात. हे केंद्रक म्हणजे एक प्रकारे ‘प्रोटेक्टिव्ह बबल’ असते. उत्क्रांतीच्या वृक्षावर अ‍ॅसगार्ड हे युकॅरिओटस्चे थेट पूर्वज किंवा ‘भगिनी’ म्हणून दिसतात.

इंग्लंडमधील लॅबोरेटरी ऑफ मॉलेक्युलर बायोलॉजी’मधील जान लोवे यांनी याबाबतच्या संशोधनाची माहिती दिली आहे. खुद्द अ‍ॅसगार्डमध्ये असे केंद्रक नसते. मात्र, ते जनुके आणि प्रोटिन्सचा एक कप्पा पेशीमध्ये ठेवतात. अशी खासियत केंद्रकाच्या रूपात युकॅरीओटस्मध्ये असते. त्यामुळे अ‍ॅसगार्डस्मध्येच प्राथमिक स्वरूपाचे केंद्रक होते व त्यामधूनच पहिली संयुक्त पेशी निर्माण झाली असे संशोधकांना वाटते. त्यापासूनच पुढे वनस्पती, प्राणी आणि मानव विकसित झाले.

Back to top button