विषारी सापासोबत राहते लहानगी | पुढारी

विषारी सापासोबत राहते लहानगी

नवी दिल्ली : अचानक साप नजरेस पडला की अंगावर काटा उभा राहतो. अशा धुडाला पाहून प्रत्येकजण पळ काढण्याच्या प्रयत्नात असतो. तर काही धाडशी लोक त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासंबंधीचा तर काही लोक त्याला यमसदनी धाडण्याचा प्रयत्न करत असतात. अशा या सरपटणार्‍या विषारी जीवासंबंधी सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान मुलगी एका खतरनाक सापासोबत अत्यंत सहजतेने राहत असल्याचे दिसून येते. मात्र, हे द़ृश्य पाहणार्‍याच्या अंगावर काटा उभा राहू शकतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लहान मुलगी एक मोठ्या सापासोबत अंथरुणावर झोपल्यासारखी दिसत आहे. हे द़ृश्य पाहून या दोहोंची मैत्री फारच जुनी असल्यासारखे वाटते. उल्लेखनीय म्हणजे साप जवळ असला तरी या मुलीच्या चेहर्‍यावर भीतीचा कसलाही लवलेशही दिसून येत नाही.

सापही त्या लहानगीच्या कुशीत आरामात पहुडलेला आहे. ज्यावेळी मुलगी जागी होते, त्यावेळी न भीता हसत हसत त्या धुडाला आणखी आपल्याजवळ घेते. मात्र, एकदाही सापाने आपल्या स्वभावानुसार मुलीवर हल्ला करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, हे विशेष. हृदयाचे ठोके वाढविणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी तो लाईक केला आहे. तर काही लोकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Back to top button