चक्क काचेसारखा पारदर्शक ऑक्टोपस | पुढारी

चक्क काचेसारखा पारदर्शक ऑक्टोपस

न्यूयॉर्क : काही जीव अगदी काचेसारखे पारदर्शक असतात. त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बेडूक, मासे यांचा समावेश होतो. आता अशाच पारदर्शक ऑक्टोपसचा एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा ऑक्टोपस इतका स्वच्छ पारदर्शक आहे की त्याच्या शरीरांतर्गत सर्व अवयव अगदी स्पष्ट दिसून येतात.

हा पारदर्शक ऑक्टोपस प्रशांत महासागराच्या एका अत्यंत खोल व दुर्गम भागात आढळून आला. या व्हायरल व्हिडीओमध्ये ऑक्टोपसचे डोळे, नसा आणि अन्ननलिका वगैरे अवयव अगदी स्पष्ट दिसून येतात. तर बाकीचे अवयव निळ्या रंगाच्या काचेसारखे दिसतात. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सुंदर ऑक्टोपसचा व्हिडीओ एका रोबोटने समुद्राच्या खोल पाण्यात बुडवून तयार केला आहे. आता तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

“हा काचेचा ऑक्टोपस आहे, जो जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय पाण्यात आढळणारा एक अतिशय अनोखा प्राणी आहे. काचेचे ऑक्टोपस खोल समुद्रात आढळतात, जेथे सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही.” असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी एका अशा माशाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता जो पाण्यात असताना काळा दिसतो व पाण्यातून बाहेर काढल्यावर काचेसारखा पारदर्शक होतो.

Back to top button