अमेरिकेतील प्रयोगशाळेत बनला खतरनाक ‘हायब्रीड कोरोना’! | पुढारी

अमेरिकेतील प्रयोगशाळेत बनला खतरनाक ‘हायब्रीड कोरोना’!

वॉशिंग्टन : कोरोना महामारीच्या भीषण आपत्तीमधून आता कुठे जग थोडे सावरू लागले आहे. मात्र, अशा वेळीच अमेरिकेतील संशोधकांच्या एका प्रयोगाने जगाची चिंता वाढवली आहे. या संशोधकांनी प्रयोगशाळेत ‘कोव्हिड-19’ ला कारणीभूत होणार्‍या कोरोना विषाणूचा एक खतरनाक व्हेरिएंट विकसित केला आहे. हा ‘हायब्रीड कोरोना’ इतका धोकादायक आहे की त्याच्यामुळे संक्रमित उंदरांचा मृत्यूदर 80 टक्के इतका आहे. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे महामारी पुन्हा सुरू होऊ शकते अशी भीती अनेकांना वाटत आहे.

हे म्युटेंट व्हेरिएंट ओमिक्रॉन आणि मूळ ‘सार्स-कोव्ह-2’ कोरोना विषाणूचे एक नवे हायब्रीड आहे. बोस्टन विद्यापीठात या विषाणूने संक्रमित 80 टक्के उंदरांचा मृत्यू झाला. ज्यावेळी याच उंदरांपैकी काहींना ओमिक्रॉनच्या संपर्कात आणले गेले त्यावेळी ते सर्व बचावले आणि त्यांच्यामध्ये केवळ काही हलकी लक्षणे दिसून आली. वैज्ञानिकांनी मानवी पेशींना या हायब्रीड व्हेरिएंटशी संक्रमित केल्यावर असे दिसून आले की ते ओमिक्रॉनच्या तुलनेत पाच पट अधिक संक्रामक आहे. मानवाने विकसित केलेले असे व्हेरिएंटस् आतापर्यंतचे सर्वात धोकादायक विषाणू ठरू शकतात. चीनच्या वुहान शहरातून कोरोना महामारी जगभर पसरली होती. तिची सुरुवात तेथील एका मांस बाजारातून झाली असे म्हटले जाते.

हा बाजार हाय सिक्युरिटी असलेल्या व्हायरॉलॉजी लॅबपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर आहे. काही मतांनुसार याच लॅबमधून ‘कोव्हिड-19’ ला जबाबदार नवा कोरोना विषाणू लिक झाला व तो मार्केटपर्यंत पोहोचला. मात्र, लॅबमधून व्हायरस लिक झाला की नाही याची चौकशी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे असे प्रयोग धोकादायकच मानले जातात. आता नव्या शोधात अमेरिकेतील बोस्टन आणि फ्लोरिडाच्या संशोधकांच्या एका टीमने ओमिक्रॉनच्या स्पाईक प्रोटिन्सला काढून त्याला मूळ कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटिनशी जोडले. त्यानंतर उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात तो अधिक संक्रमणशील व धोकादायक असल्याचे दिसून आले.

Back to top button