उष्णतेने होरपळतोय बारामती तालुका.. | पुढारी

उष्णतेने होरपळतोय बारामती तालुका..

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून बारामती शहर आणि तालुका वाढत्या तापमानामुळे अक्षरशः होरपळून निघाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. निरा-बारामती ते काटेवाडीपर्यंतचा बागायती पट्टा उन्हामुळे हैराण झाला आहे. उच्चांकी तापमानाची नोंद दररोज होऊ लागली आहे. कमालीची उष्णता असल्याने बारामतीकर भाजून निघत आहेत. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने दुपारच्या सत्रात रस्त्यांवरील वर्दळ थंडावली आहे. दुचाकीवरून प्रवास करणे उन्हाच्या झळांनी असह्य होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाही कमालीच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने रसवंतिगृहे, आईस्क्रीम पार्लर, सरबत, ताक, लस्सी यांना मागणी वाढली आहे. पिण्याच्या पाण्याच्या थंड बाटल्यांचाही खप कमालीचा वाढला आहे. गॉगल व टोपीच्या विक्रीतही चांगलीच वाढ झाली आहे. विहिरी, तलाव तसेच निरा डावा कालव्यावर पोहणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शेतकरी सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत आहे. तीव्र उन्हाचा फटका वन्यप्राण्यांसह पाळीव जनावरांनाही बसत आहे. तीव्र उन्हाचा यात्रा-जत्रांवर परिणाम झाला आहे. संपूर्ण मे महिना उन्हाच्या तीव्रतेतच काढावा लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, त्या वाढत्या तापमानापुढे कमी पडत आहेत.

हेही वाचा

Back to top button