पासलीत पाण्यासाठी लेकराबाळांची वणवण; जलजीवन योजनेचे तीन तेरा! | पुढारी

पासलीत पाण्यासाठी लेकराबाळांची वणवण; जलजीवन योजनेचे तीन तेरा!

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : तोरणागडाच्या पायथ्याच्या पासली (ता. राजगड) येथील 76 लाख रुपये खर्चाची जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे ठप्प आहे, तर दुसरीकडे पाणवठे कोरडे पडू लागल्याने घोटभर पाण्यासाठी लेकराबाळांसह महिलांना रणरणत्या उन्हात वणवण करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी पासली गावासाठी शासनाने जलजीवन योजना मंजूर केली. मात्र, विहीर तसेच पाण्याच्या टाकीसाठी कागदपत्रांची पूर्तता न करताच योजनेचे काम सुरू करण्यात आले. विहीर तसेच टाकी न बांधता ठेकेदाराने जलवाहिन्याही टाकल्या.

जवळपास 60 टक्के जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले. विहीर व टाकीसाठी जमिनीच उपलब्ध नसल्याने दोन वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत खितपत पडले आहे. सध्या जुन्या योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावात दोन दिवसांनी एकदा पाणी सोडले जाते. अपुर्‍या पाण्यामुळे माणसांसह जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने पासली पाणी योजनेसाठी भरघोस निधी मंजूर केला. मात्र, अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे योजना रखडल्याचे चित्र पुढे आले आहे. पाणीटंचाईची समस्या कायमची दूर करण्यासाठी माजी सरपंच अंकुश तुपे व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

घाटेवस्तीत तीन किमीवरून आणावे लागते पाणी

पासली गावच्या पूर्वेस असलेल्या घाटेवस्तीत जुन्या योजनेचे पाणी पोहचत नाही. त्यामुळे तेथे तीव्र टंचाई आहे. घाटेवस्तीतील महिलांना तीन किलोमीटर अंतराची पायपीट करून पाणी आणावे लागते. सध्या शाळेला सुट्या असल्याने लहान मुले आपल्या आई-वडिलांसह पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण करीत आहेत.

तांत्रिक अडचणींमुळे जलजीवन योजनेचे काम बंद आहे. टाकी तसेच विहिरीसाठी जागा
उपलब्ध झाली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याप्रकरणी लक्ष घातले आहे. त्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

– चेतन ठाकूर, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग

जुन्या योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याने दोन आठवड्यांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. नवीन योजनेच्या विहीर व टाकीसाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे आता हे काम मार्गी लागणार आहे.

– अंकुश तुपे, माजी सरपंच, पासली

यंदा उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्या पासूनच पाणवठे कोरडे पडत आहेत. जलजीवन योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

– किसन घाटे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

Back to top button