‘वर्क फ्रॉम होम’साठी ‘फेसबुक’ कर्मचार्‍यांना देणार 75 हजार! | पुढारी

‘वर्क फ्रॉम होम’साठी ‘फेसबुक’ कर्मचार्‍यांना देणार 75 हजार!

वॉशिंग्टन :

‘कोव्हिड-19’ महामारीमुळे सध्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासच सांगितलेले आहे. यामध्ये ‘फेसबुक’सारखी बडी कंपनीही आहे. या दिग्गज कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना जुलै 2021 पर्यंत घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर घरातच कार्यालयीन कामासंबंधी तयारी करण्यासाठी ‘फेसबुक’ आपल्या कर्मचार्‍यांना 75 हजार रुपये देणार आहे!

यापूर्वी ‘गुगल’ आणि ‘ट्विटर’नेही आपल्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सवलत दिलेली आहे. आता ‘फेसबुक’नेही आपल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत हे पाऊल उचलले. कंपनीच्या प्रवक्त्या ननेका नॉर्विल यांनी सांगितले की, आरोग्य तज्ज्ञ आणि सरकारी सल्लागार यांच्या सल्ल्यानंतर कंपनीने याबाबत अंतर्गत चर्चा केली. त्यानुसार कंपनीच्या कर्मचार्‍यांना जुलै 2021 पर्यंत स्वइच्छेने घरीच काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय आम्ही होम ऑफिसच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक हजार डॉलर्सही (सुमारे 75 हजार रुपये) देत आहोत. ‘फेसबुक’चे एकूण 48 हजार कर्मचारी मार्चपासूनच घरातून काम करीत आहेत. यापूर्वी कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ यावर्षीच्या अखेरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली होती.

Back to top button