विमानाच्या इंजिनवर कशासाठी असतो छोटा पंखा? | पुढारी

विमानाच्या इंजिनवर कशासाठी असतो छोटा पंखा?

कॅलिफोर्निया : विमान प्रवासामुळे वेळ वाचतो. हजारो किलोमीटर्सचे अंतर विमानांमुळे काही तासात कापले जाते. ज्यांनी विमान प्रवास केलेला आहे, त्यांनाही पुढील विमान प्रवासाची ओढ लागलेली असते आणि ज्यांनी केलेला नाही, त्यांचेही नियोजन असतेच असते. आता विमानात बसल्यानंतर विमानाचे पंख आपल्याला छोट्या विंडोमधून सहज दिसून येतात. विमानाच्या इंजिनवरील हे पंख खाली झुकलेले असतात. काही वेळा यावर ‘नो स्टेप’ असा इशाराही लिहिलेला असतो. या छोट्या पंखांचे नेमके काय काम असते, त्याचा मात्र आपण क्वचितच विचार केला असेल.

असे छोटे पंख सर्व कमर्शिअल फ्लाईटच्या इंजिनच्या काठावर लावलेले असतात. त्यांना नॅकले चाईन्स किंवा नॅकले स्ट्रेक्स असेही म्हटले जाते. ते जाणीवपूर्वक डेल्टाच्या आकाराचे बनवलेले असतात. हे स्ट्रेक्स एअरफ्लो रेग्युलेट करतात आणि महत्त्वाचे म्हणजे ते अजिबात हलत नाहीत. विमान टेकऑफच्या वेळी फिरते किंवा वर जाते तेव्हा मोठे इंजिन हवेचा प्रवाह थांबवते आणि तो वेगळा करते. त्यामुळे दबाव निर्माण होतो आणि विमान थांबू शकते. हा दाब कमी करण्यासाठी हे छोटे पंख लावलेले असतात, जेणेकरून हवेचा प्रवाह पंखांपर्यंत राहील. जसजसे विमान वर जाईल, तसतसे हे छोटे पंख हवेचा दाब कमी करतात. त्यामुळे विमान व्यवस्थित पुढे जाऊ शकते.

जवळजवळ सर्व जेट एअरलाईन्सवर असे पंख असतात; मग ते कमर्शिअल असोत वा लष्करी, सर्वांमध्ये नॅकेल स्ट्रेक्स लावलेले असतात. ते एअरबस ए 320 आणि बोईंग 737 सारख्या नॅरोबॉडीपासून ते बोईंग 777 आणि 787 मध्येही वापरले जातात. काही विमान मॉडेल्समध्ये एका इंजिनच्या दोन्ही बाजूला दोन स्ट्रेक असतात. बोईंग सी-17 ग्लोबमास्टर आणि मॅकडॉनेल डग्लस एमडी-11, यांचा यात समावेश होतो. नव्या एअरबस ए-321निओ आणि ए-350-1000 यांसारख्या विमान मॉडेल्समध्येदेखील एका इंजिनच्या दोन्ही बाजूला दोन नॅकेल स्ट्रेक्स असतात.

संबंधित बातम्या
Back to top button