लठ्ठपणाचा प्रदूषणाशीही आहे संबंध | पुढारी

लठ्ठपणाचा प्रदूषणाशीही आहे संबंध

लंडन : लठ्ठपणाला अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की रासायनिक प्रदूषण हे मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्येला कारणीभूत ठरत आहे. 1975 च्या तुलनेत जगभरात लठ्ठपणाच्या समस्येत तिप्पट वाढ झाली आहे. या समस्येने आता एखाद्या महामारीसारखेच स्वरूप घेतलेले आहे. जगभरात सध्या चार कोटींपेक्षाही अधिक मुलं लठ्ठ आहेत. तसेच 200 कोटी प्रौढ लोकांचे वजनही अधिक आहे.

एका जागतिक संशोधनातून याबाबतची माहिती समोर आली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञानात आतापर्यंत ‘ओबेसोजेन्स’ नावाच्या विषारी घटकाला स्वीकारलेले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे दिसून आले आहे की शरीराच्या वजनाला नियंत्रित करण्याच्या पद्धतीला असे ‘ओबेसोजेन्स’ प्रभावित करतात. वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारी काही रसायने जनुकांच्या काम करण्याच्या पद्धतीलाही बदलू शकतात आणि ही जनुके अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढ्यांमध्येही जाऊ शकतात. अशा प्रदूषकांमध्ये ‘बिस्फेनॉल ए’ (बीपीए) चा समावेश आहे.

हे रसायन प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच काही कीटकनाशके, फ्लेम रेटरडेन्ट आणि हवेच्या प्रदूषणातूनही हे फैलावते व जनुकांवर प्रभाव टाकून अधिक खाण्यास प्रवृत्त करते. अशा रासायनिक प्रदूषणामुळे जगभर लठ्ठपणाची समस्या फैलावत आहे. ‘डीडीटी’ या कीटकनाशकाचाही असाच दुष्परिणाम महिलांवर झालेला पाहायला मिळाला होता. त्यांच्यामध्येही या कीटकनाशकामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत होती. सध्या डीडीटीवर बंदी असली तरी अशा प्रभावित महिलांच्या नातवंडांमध्येही ती समस्या अनुवंशिक रूपाने आलेली आहे.

Back to top button