या गावातील सर्व लोक अन् जनावरेही अंधच | पुढारी

या गावातील सर्व लोक अन् जनावरेही अंधच

वॉशिंग्टन : जगात अनेक रहस्यमयी घटना घडत असतात. त्याबद्दल ऐकून आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असेच एक गाव असून त्याच्याबद्दलची माहिती ऐकणारा आणि वाचणारा तोंडात बोटे घातल्याशिवाय राहत नाही. हे गाव मेक्सिकोमध्ये असून तेथील माणसे आणि जनावरेही अंधच आहेत. या विचित्र आणि अनोख्या गावाचे नाव टिल्टपेक.

टिल्टपेक गावामध्ये राहणार्‍या माणसाबरोबरच त्यांची जनावरेही अंध आहेत. यामुळे टिल्टपेकला जगातील एक रहस्यमयी गाव म्हणून ओळखले जाते. गावामध्ये एका विशेष जनजातीचे लोक राहतात. या गावासंदर्भात माहिती अशी की, ज्यावेळी एखाद्या बाळाचा जन्म होतो, त्यावेळी ते सर्व अवयवांच्या बाबतीत तंदुरुस्त असते. म्हणजेच त्याचे डोळेही अगदी सुस्थितीत असतात. मात्र, काही दिवस उलटले की, त्या मुलाच्या डोळ्यांची नजर जाते आणि तो अन्य गावकर्‍यांसारखा अंध बनतो.

ग्रामस्थांच्या मते, गावकर्‍यांच्या अंधपणास एक शापित झाड जबाबदार आहे. या झाडाचे नाव लावजुइला. या झाडास पाहताच लोकांची नजर जाते. एवढेच नव्हे तर जनावरे आणि पक्षीही अंध होतात. शास्त्रज्ञांच्या मते, गावकर्‍यांचा अंधत्वास झाड जबाबदार नाही. तर एखादी माशी कारणीभूत आहे. या विषारी माशीच्या दंशाने लोकांची नजर जाते. दरम्यान, या गावात सध्या 300 लोक राहतात. हे सर्व लोक एकूण 70 झोपड्यांमध्ये राहतात. विशेष म्हणजे या झोपड्यांना खिडक्याही नसतात.

Back to top button