अवघ्या 2 कैद्यांचे सर्वात छोटे कारागृह! | पुढारी

अवघ्या 2 कैद्यांचे सर्वात छोटे कारागृह!

सार्क : भल्यामोठ्या तुरुंगांची चर्चा होते, त्यावेळी तिहार, येरवडाचे नाव पुढे येते. सेंट्रल जेलच्या वेबसाईटनुसार, तिहार कारागृहाची 10 हजार 26 कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे 19 हजार 500 हून अधिक कैदी ठेवले जातात. आता ही झाली मोठी कारागृहे. मात्र, जगातील सर्वात छोटे कारागृह कुठे आहे, याची क्वचितच कल्पना असेल. ब्रिटनमधील सार्क बेटावर जगातील सर्वात छोेटे कारागृह वसलेले असून, येथे फक्त दोनच कैद्यांना ठेवता येते, अशी त्याची रचना आहे. 168 वर्षांपूर्वी या कारागृहाची उभारणी झाली होती.

ब्रिटनमधील नोंदीनुसार, 1856 मध्ये सदर कारागृह बांधले गेले. यात आधीपासून केवळ दोनच कैद्यांना ठेवता येऊ शकते. आश्चर्य म्हणजे या दीड शतकांहून अधिक वर्षांच्या कालावधीत या कारागृहात काहीही बदल करण्यात आलेला नाही. आतील रचना मात्र बदलली गेली असून, विजेची सोय तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2023 मधील जनगणनेनुसार, या बेटावर 562 लोकांचे वास्तव्य राहात आले आहे.

या कारागृहाची उभारणी कशी झाली, ते ही आश्चर्याचे आहे. 1832 मध्ये न्यायालयाने कारागृह उभारण्याचे आदेश दिले. मात्र, त्याकाळी यासाठी पैसे वेळेत उपलब्ध न झाल्याने कारागृह उभारणीला चक्क 24 वर्षे लागली. या कारागृहातील एक खोली 6 बाय 6 फूट, तर दुसरी खोली 6 बाय 8 फुटांची आहे. दोन्ही खोल्यांमध्ये लाकडाचे हलके बेड आहेत. येथे जास्तीत जास्त 2 किंवा 3 कैदी ठेवले जाऊ शकतात. मात्र, या बेटावर मुळात गुन्ह्यांचे प्रमाणच इतके कमी आहे, की यामुळे पूर्ण बेटावर केवळ दोनच पोलिस तैनात असतात. त्यामुळे जवळपास या कारागृहाचा वापर होतच नाही.

संबंधित बातम्या
Back to top button