Pune Porsche Accident : अपहरणासाठी वापरलेल्या बीएमडब्ल्यूचा शोध सुरू | पुढारी

Pune Porsche Accident : अपहरणासाठी वापरलेल्या बीएमडब्ल्यूचा शोध सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील अपघातात दोघांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी चालकाला बळीचा बकरा बनविण्यासाठी ज्या बीएमडब्ल्यू कारमधून चालकाचे अपहरण झाले ती कार विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांनी लपवून ठेवली आहे. ही कार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. सध्या सुरेंद्र अगरवाल पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला अपहरण, मारहाण केल्याप्रकरणी तसेच धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे या कारबाबत विचारणा केली जात आहे.

मागील शनिवारी अडीचच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये अल्पवयीनाने त्याच्याकडील आलिशान पोर्शे कारने तरुण- तरुणीला उडवले होते. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलाला पोलिस ठाण्यात नेल्यानंतर वाचविण्याचा प्रयत्न झाला होता. गुन्हा मुलाने करूनदेखील ती कार अल्पवयीन मुलगा चालवत नसून चालकच चालवत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. याच दरम्यान पोलिस ठाण्यातून चालक घरी जात असताना त्याला पुन्हा सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. तेथून त्याला एका काळ्या बीएमडब्ल्यू कारमध्ये घालून त्याचे अपहरण करत बंगल्यावर नेण्यात आले. तेथे त्याला बक्षिसाचे आमिष दाखवून गुन्हा कबूल करण्यास दबाव टाकण्यात आला.

तसे न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्याला बंगल्यातील एका खोलीत डांबून ठेवले होते. मात्र, आपला पती घरीच न आल्याने चालकाची पत्नी अगरवाल याच्या बंगल्यावर नातेवाइकांसह गेली. तेथे आरडाओरडा झाल्यानंतर चालकाला त्यांना सोडून देण्यास भाग पडले. चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी व त्याला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याची बाब तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करत मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवाल याला बेड्या ठोकल्या. तसेच विशाल अगरवाल याच्यावरही गुन्हा दाखल केला. आता गुन्ह्यात चालकाच्या अपहणासाठी वापरलेल्या कारचा शोध पोलिस घेत आहेत. गुन्ह्यातील कार मिळाल्यास पुराव्याची साखळी जोडण्यास पोलिसांना आणखी मदत मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका अपघातामुळे तीन पिढ्यांना पोलिस ठाण्याची हवा

अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कार अल्पवयीन मुलगा चालवत नव्हता. चालकाने अपघात केल्याचा बनाव अगरवाल यांनी रचला होता. याच कारणास्तव अगरवाल कुटुंबातील तिन्ही पिढ्यांना एकाच वेळी पोलिस ठाणे आणि कारागृहाची हवा खावी लागत आहे.

हेही वाचा

Back to top button