Jalgaon Yaval News | वादळी वाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | पुढारी

Jalgaon Yaval News | वादळी वाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – यावल तालुक्यातील आंबापाणी या पाड्यावरील आदीवासी वस्तीवर रविवार (दि.२६) रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे दुर्देवाने गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ वर्षाचा बालक जो की वेळीच मदत मागण्यासाठी बाहेर पडल्याने तो सुदैवाने बचावला आहे.

यावल तालुक्याला रविवार (दि.२६) रोजी सायंकाळी वादळी वार्‍याचा फटका बसला. यात तालुक्यातील अनेक गाव व शिवारांमध्ये असलेले पीके जमीनदोस्त झाले आहे. शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यावल तालुक्यातील आंबापाणी या पाड्याजवळ असलेल्या या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर या वादळीवारामुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

रविवार (दि.२६) रोजी सायंकाळी जोरदार वादळी वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून जीव मुठीत धरुन घरात बसलेले होते. परंतु जोरदार वादळ आलं आणि त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्‍याखाली अडकले गेले. त्यांना श्‍वास घेण्यासाठी अडचणी आल्याने गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली आहे.

दरम्यान, खूप प्रयत्न करून या ढिगार्‍याखालून कुटुंंबातील शांतीलाल नानसिंग पावरा ( वय वर्षे ८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले आहे. त्याने बचावासाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावल्यावर या दुर्घटनेची माहिती मिळाली. पावरा कुटुंबातील चौघे मृत झाले आहे. तरी शांतीलाल ( वय वर्षे ८) हा या घटनेतून बचावला आहे.

आंबापाणी या आदिवासी पाडा जवळील घटनेची माहिती मिळतात तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह आबापणी या पाड्यावर धाव घेतली. रविवार (दि.२६) रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगार्‍याखालून काढून शव विच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मयत नानसिंग पावरा यांचे वडिल आणि अन्य आप्त देखील दाखल झाले असून शवविच्छेदन अहवालानंतर या चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button