उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरूच; ‘बॉलर‘सह 14 पब, बारवर कारवाई | पुढारी

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरूच; ‘बॉलर‘सह 14 पब, बारवर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अपघातानंतर सर्व पातळीवर कारवाईचा धडका सुरू आहे. कल्याणीनगर भागातील बॉलर पबसह 14 पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यरात्री कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई केल्याने शनिवारी मध्यरात्री या भागात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. ज्या पबमधून अपघात झालेले तरुण-तरुणी बाहेर पडले, त्याच बॉलरमध्ये शनिवारी पुन्हा गोंगाट सुरू होता. दरम्यान, या पबने काही अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यावर कारवाई करण्यात आली.
कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पबमध्ये मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीनंतर घरी परतत असताना अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार अनिश आणि सहप्रवासी अश्विनी यांना कल्याणीनगर भागात धडक दिली.
अनिश आणि अश्विनी बॉलर पबमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना मोटारीने धडक दिली होती. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या पब आणि बारवर कारवाई करून ते बंद केले आहेत.  कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी 14 पब, बारविरुद्ध कारवाई करून लाखबंद करण्यात आल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे
दिसून आले.
मद्यविक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हॉटेलविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आठवडाभरात 54 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब लाखबंद (सील) करण्यात आले आहेत.
– चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
हेही वाचा

Back to top button