डॉगीला भारतात पाठवून, स्वतः राहिला युक्रेनमध्ये | पुढारी

डॉगीला भारतात पाठवून, स्वतः राहिला युक्रेनमध्ये

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरूच आहे. ‘ऑपरेशन गंगा’ नामक मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकार सध्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करत आहे. या मिशनमधून काळजाला भिडणारी उदाहरणेही नजरेस पडत आहेत. हरियाणाच्या रोहतकमधील एमबीबीएसचा विद्यार्थी साहील दुहन याने रशियन प्रजातीच्या आपल्या पाळीव श्वानाला भारतात पाठविले आणि सहकार्‍याला मदत करण्यासाठी तो स्वत: युद्धग्रस्त युक्रेनमध्येच राहिला.

युक्रेन युद्धात होरपळणार्‍या युक्रेनमध्ये पाळीव श्वानाला एकट्याने सोडणे योग्य नव्हते. यामुळे साहीलने आपल्या सहकार्‍यासोबत आपल्या श्वानाला भारतात पाठविले. तसेच आपल्या दुसर्‍या सहकार्‍याला मदत करण्यासाठी तो युक्रेनमध्येच राहिला. सहकार्‍याला अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा असून, या मुलाची आई अत्यंत आजारी असल्याचे समजते.

साहील सोबत नसल्याने ‘सुंडू’ नामक पाळीव श्वान अत्यंत निराश असते. गेटचा आवाज येताच साहीलच आल्याचे समजून ‘सुंडू’ धावत गेटकडे जातो. साहीलच्या कुटुंबाकडून श्वानाची चांगली देखभाल केली जात असली तरी त्याला आणखी एका समस्येला सामोरे जावे लागत आहे. कारण, युक्रेनमध्ये कडाक्याची थंडी असते. अशा थंड वातावरणात राहण्याची त्याला सवय आहे. मात्र, हरियाणातील तापमान वाढत असल्याने बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना ‘सुंडू’ला त्रास होत आहे, असे साहीलच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Back to top button