Loksabha election | आम्ही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार! ‘या’ कारणामुळे मतदारांमध्ये नाराजी | पुढारी

Loksabha election | आम्ही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार! 'या' कारणामुळे मतदारांमध्ये नाराजी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी स्वतः शासकीय कर्मचारी आहे. माझ्या कुटुंबातील सर्वांची नावं मतदार यादीत आहेत. माझं एकट्याचंच नाव यादीत सापडलं नाही. माझ्या सोसायटीतील इतरांचंदेखील असंच झालं आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीचंच कसं काय नाव गायब होऊ शकतं ? हे कळत नाही. त्यामुळं आमच्यावर मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याची खंत सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागातील एका मतदाराने व्यक्त केली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील हे प्रातिनिधीक उदाहरण आहे.  अनेक नागरिकांची नावे गायब झाल्याची  चर्चा सध्या शहरात सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात मंगळवारी अनेकांना नावे सापडली नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही मतदानाचा हक्क बजावता आला नाही. आता पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान तीन दिवसांवर आले असताना अजूनही मतदारांची नावे सापडत नसल्याने मतदारराजा नाराजी व्यक्त करत आहे.  पुणे जिल्ह्यात 2019 मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सुमारे दोन लाखांनी मतदार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र मतदार यादी तयार करताना तांत्रिक चुका झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे बारामती लोकसभा मतदानप्रसंगी प्रशासनाला आलेल्या अनुभवावरून पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे नाव सापडले नाही किंवा गायब झाले असे वाटल्यास तातडीने नवमतदार नोंदणीचा फॉर्म क्रमांक सहा भरावा. त्यानंतर विधानसभेसाठी मतदानाची संधी उपलब्ध होऊ शकेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हेल्पलाईनद्वारे अनेकांना मतदार यादीतून नाव शोधून देण्यास मदत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघातील मतदारांनी नावे आढळली नसल्यास तातडीने नवमतदाराचा फॉर्म क्रमांक सहा भरून द्यावा. त्यानुसार निवडणुकीनंतर तातडीने नोंद करण्यात येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची संधी उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.  तर मतदार नोंदणीनंतर यादी तयार करताना तांत्रिक प्रक्रियेतील चुकांमुळे तसेच एकसारख्या छायाचित्रांमुळे नावे वगळली असावी, असा अंदाज आहे.

दिशाभूल करणार्‍या संदेशांपासून सावध राहा…

मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र.17 चा अर्ज  भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.  अशा संदेशांपासून सावध रहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. चुकीची माहिती पसरविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नाव एकाचं आणि फोटो दुसर्‍याचा…

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.7) मतदान झाले. त्या मतदानावेळी बारामतीतील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोथरूड, नर्‍हे, आंबेगाव, कात्रज, धनकवडी, फुरसुंगी, सिंहगड रोड, धायरी आदी भागातील मतदारांची नावे वगळल्याचे पुढे आले. त्याबाबत अनेक मतदारांनी तक्रारी केल्या. काही मतदारांच्या नावापुढे दुसर्‍याच व्यक्तीचे यादीमध्ये फोटो असल्याचे देखील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी आढळून आले. तर काहींचे मतदान दुसर्‍याच मतदारसंघात गेल्याच्याही तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.
आमच्याकडेदेखील मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी मतदार करत आहेत. आम्ही त्या सर्व तक्रारी एकत्र करून जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहोत, यापूर्वीदेखील जिल्हाधिकार्‍यांना भेटून म्हणणे मांडले आहे. एखाद्या विशिष्ट भागातील, विशिष्ट मतदारांची नावे नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकार्‍यांशी बोलणार आहोत.
– एक पदाधिकारी, काँग्रेस पक्ष.
मतदारांनी मतदानापूर्वी मतदार यादीत नावे शोधायला हवीत. त्यासाठी वारंवार मतदार यादीत नाव शोधल्यास नाव आहे की नाही याची खातरजमा करता येईल. नाव नसल्यास नव्याने पुन्हा नोंदणीचा फॉर्म भरावा.
-डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी
पुण्यात अनेक भागात मतदारांची नावे सापडत नाहीत. विविध अ‍ॅपच्या माध्यमातून आम्ही मतदारांची नावे शोधत आहोत. काही मतदारांचे मतदान कार्ड आहे. परंतु, त्यांची नावे नाहीत. जिल्हाधिकार्‍यांना आम्ही याबाबत निवेदन देणार आहोत. यावर काही उपाययोजना करता येतील का हे प्रशासनाने बघावे, अशी आमची मागणी आहे. नावे नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे, तांत्रिक अडचणी सोडविल्या पाहिजेत.
-पुनीत जोशी, सरचिटणीस, भाजप, पुणे शहर
हेही वाचा

Back to top button