विज्ञाननिष्ठ महात्मा बसवेश्वर | पुढारी

विज्ञाननिष्ठ महात्मा बसवेश्वर

सुभाष महाजन

समाजातील वर्गभेद, वर्णभेद, लिंगभेद व जातिभेद नष्ट करून समतेच्या तत्त्वासाठी व नवविचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा ऊर्फ बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारा समाजात रुजविली. त्यांनी समताधिष्ठित लिंगायत धर्माची स्थापना केली. या धर्माचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा धर्म विज्ञाननिष्ठ आहे. आज बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने.

धर्म आणि विज्ञान यांच्यात समन्वय असेल तरच तो समाज प्रगती करू शकतो. धर्म आणि विज्ञानाची दोहोंची फारकत झाली तर तो समाज भरकटत जातो. 21 व्या शतकात विज्ञानामुळे विविध क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केलेली आहे; परंतु या प्रगतीस धार्मिक अधिष्ठान नसल्यामुळे भौतिक प्रगती होऊनही मानवाला आत्मिक समाधान मिळत नाही. लिंगायत धर्म हा विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेला धर्म आहे. या धर्मात अंधश्रद्धा, कर्मकांड, जुनाट रूढी, अनावश्यक प्रथा व परंपरा यांना स्थान नाही. हा धर्म एकेश्वरवादाचे समर्थन करतो व मूर्तिपूजेस विरोध करतो. वर्ण व्यवस्था, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्री दास्यत्व, देवदासी प्रथा यांना या धर्मात स्थान नाही. तसेच बळी देण्याची प्रथा, पशुहत्या, हिंसा, नवस सायास व्रतवैकल्ये, तीर्थाटन-यात्रा, यज्ञ, होमहवन, ढोंगबाजी, बुवाबाजी, भोंदूगिरी, चमत्कार, ऐतखाऊ भिक्षा वृत्ती यांना बसवण्णांनी विरोध केला. तसेच मंदिर संस्कृती, पुरोहितशाही, जादूटोणा, तंत्र-मंत्र, भूत-पिशाच्च, खासगी सावकारी, व्याज देणे-घेणे या बाबी लिंगायत धर्मात निंद्य आहेत.

पंचांग, शुभ वेळ, शुभ दिवस, ज्योतिष, भविष्य, नक्षत्र, तिथी या गोष्टी लिंगायत धर्मात मान्य नाही. प्रत्येक वेळ ही शुभ व प्रत्येक दिवस हा शुभच असतो. सुतक, विटाळ, सोवळे ओवळे, शकुन-अपशकुन, पीजेचे अवडंबर या बाबी या धर्मात मानत नाहीत. वेद, वेदांगे, आगम, उपनिषदे आदींना या धर्मात स्थान नाही. उपवासाला या धर्मात धार्मिक अधिष्ठान नाही, तर वैज्ञानिक अधिष्ठान आहे. थोडक्यात, शाकाहाराचा पुरस्कार करणारा हा प्रगत, वैज्ञानिक धर्म आहे.

संबंधित बातम्या

स्वर्ग व नरक या कल्पना लिंगायत धर्माने नाकारलेल्या आहेत. वैदिक धर्मशास्त्रानुसार सत्कार्य करणारेच स्वर्गात जातात व दुष्कृत्य करणारे, घोर अपराध करणारे नरकात जातात. प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार या गोष्टी ठरत असतात. प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब ठेवणारा चित्रगुप्त असून, त्याच्या वरचा अधिकारी म्हणजे यम होय. यमाच्या आज्ञेनुसार चित्रगुप्त प्रत्येक व्यक्तीच्या कार्याची कागदपत्रे योग्यरीतीने हाताळून ज्याच्या त्याच्या नफा-तोट्याप्रमाणे स्वर्गात किंवा नरकात पाठवतो. कर्माचा सिद्धांत स्वीकारल्यामुळे समाजात वर्षानुवर्षे असा समज होता व आजही आहे.

बसवण्णांनी स्वर्ग-नरक या संकल्पना नाकारल्या आहेत. त्यांच्या मते स्वर्ग कुठे तरी वर आहे व नरक कुठे तरी खाली आहे, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. या केवळ काल्पनिक कथा होत. सत्य बोलणे, सदाचरण हेच स्वर्ग निर्माण करते, तर आपले खोटे बोलणे, वाईट आचरण (अनाचार) नरक निर्माण करते. नैतिक आचरणातून पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करता येतो, अशी शिकवण बसवण्णा यांनी दिली. व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा जीव नाश पावत नाही, तर तो जीव एका शरीरातून दुसर्‍या शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म प्राप्त करतो, हा सिद्धांत आपल्या देशात अनेक प्रमुख धर्मांनी मान्य केलेला आहे; पण पुनर्जन्मास कोणताही शास्त्रीय आधार नसल्यामुळे हा सिद्धांत बसवण्णांनी पूर्णपणे नाकारला आहे. लिंगायत धर्मशास्त्रानुसार व्यक्तीचा देह नाश पावल्यानंतर शिवामधून आलेला जीव पुन्हा शिवामध्येच विलीन होतो. जीव व शिव यांच्या एक होण्याच्या स्थितीला लिंगायत लोक लिंगैक्य किंवा शिवैक्य म्हणतात. जशा समुद्रात निर्माण झालेल्या लाटा समुद्रातच विलीन होतात. लिंगायत धर्म तत्त्वज्ञानात जीव शिवाशी तादात्म्य पावल्यानंतर पुनर्जन्माचा प्रश्नच उद्भवत नाही.

Back to top button