अजित पवारांनी दुसर्‍याच्या पक्षात नाक खुपसू नये- शरद पवार | पुढारी

अजित पवारांनी दुसर्‍याच्या पक्षात नाक खुपसू नये- शरद पवार

सातारा, पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांनी त्यांचा पक्ष चालवावा, दुसर्‍याच्या पक्षात नाक खुपसू नये, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार पक्षात स्वत: निर्णय घेतात आणि बाहेर आल्यानंतर पक्षाचा निर्णय सर्वानुमते असल्याचे सांगतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली होती. त्याला खा. शरद पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे स्थान संकटात आले, असे वाटत असल्यामुळे धर्मांधवादी विचारांना सोबत घेऊन ते पुढे वाटचाल करत आहेत. मोदींचा आत्मविश्वास आता कुठे गेला? असा सवालही खा. शरद पवार यांनी केला.

खा. शरद पवार म्हणाले, मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांना मिळून लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे 30 ते 35 खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील, याची खात्री आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रातील लोकांचे समर्थन मिळत आहे. हे पाहून मोदींचा आत्मविश्वास निघून गेला आहे. त्यामुळे इथून पुढे धर्मांधवादी शक्तींना सोबत घेऊनच ते काम करतील, असे दिसत आहे.

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अजून निश्चित नसल्याची टीका अमित शहा यांनी केली होती, त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, अमित शहा सांगतात त्यात काही अर्थ नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार कुठे ठरला होता?

भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत विचारले असता खा. शरद पवार म्हणाले, आमचा कोणताही निर्णय भाजपसोबत जाण्याचा नव्हता. आमचा त्यांचा विचार एकसारखा नाही. आमच्यातील काही सहकारी भाजपमध्ये जाण्याच्या विचाराचे होते. मात्र, तो पक्षाचा निर्णय नाही. त्यामुळे ते म्हणतात त्यात तथ्य नाही.

लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पैसे वाटत असल्याचा आरोप झाला, याबाबत विचारले असता त्याला दुजोरा देत शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले जात होते, याचे फोटो, व्हिडीओ फिरत होते. माझ्या आतापर्यंतच्या राजकारणात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रकार कधी केला नाही. परंतु, एक नवीन संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजू पाहतेय, हे धोकादायक आहे.

भाजपची ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग बूथच ताब्यात घेण्याचा प्रकार केला, याबाबत निवडणूक आयोगानेच लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे, असेही पवार म्हणाले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.

Back to top button