दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; पिंपरी पेंढार येथील घटना | पुढारी

दुर्दैवी ! बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; पिंपरी पेंढार येथील घटना

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील गाजरपट येथे बाजरी पिकाचे राखण करणाऱ्या नानुबाई सीताराम कडाळे (वय ४५) या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की,नानुबाई सिताराम कडाळे ही महिला बाजरी पिकाचे राखण करत असताना बाजूच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने आज शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास या महिलेवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढून नेले व ठार केले.

या घटनेची माहिती परिसरात समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या विरोधामध्ये मोठा आक्रोश सुरू आहे. वनविभागाकडून कोणत्याही प्रकारचे बिबट्यांसंदर्भात सहकार्य मिळत नाही अशा प्रकारची तक्रार जनतेची आहे. घटना घडल्यावर वनविभागाचे कर्मचारी येतात आणि मग उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतात वास्तविक घटना घडण्या पूर्वीच वनविभागाकडून समुपदेशनाची गरज आहे.

हल्ल्याचे प्रमाण वाढले

जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे ५ तारखेला पिंपळवंडीच्या लेंडेस्थळ या ठिकाणी अश्विनी हुळवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.तर दोन दिवसांपूर्वी काळवाडीच्या रुद्र फापाळे या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून वन विभागाने बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी आता जुन्नर तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

Back to top button