‘या’ देशात ब्रेड, दुधापेक्षा महाग बर्फाचे तुकडे! | पुढारी

‘या’ देशात ब्रेड, दुधापेक्षा महाग बर्फाचे तुकडे!

बमाको : परिस्थितीनुसार कुठे, कोणत्या वस्तूला महत्त्व येईल, हे काही सांगता येत नाही. सध्या आपल्याच देशात नव्हे, तर अनेक देशांमध्ये भीषण उन्हाळ्याने लोक त्रस्त झाले आहेत. पश्चिम आफ्रिकेतील माली देशात तर रेकॉर्ड ब्रेक तापमानवाढ पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, इथं आइस-क्यूब्ज (बर्फाचे तुकडे) ब्रेड आणि दुधापेक्षा जास्त किमतीने विकले जात आहेत.

मालीची राजधानी बमाकोमध्ये प्रचंड उकाड्याबरोबरच विजेचीही समस्या आहे. वीज गेल्यामुळे लोकांच्या घरातले फ्रीजही काम करत नाहीयेत. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू गोठवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेदरम्यान गारवा टिकवून ठेवण्यासाठी आइस क्यूब्जची मदत घ्यावी लागत आहे. बमाकोमध्ये सध्या तापमान वाढून 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. खरंतर अशा परिस्थितीत आइस क्यूब्ज एका मर्यादेपर्यंतच काम करतात आणि त्यांच्या किमती ज्यापद्धतीने वाढत आहेत, लोकांचं आयुष्य खडतर होताना दिसत आहे. काही ठिकाणी आइस क्यूब्जच्या एका पिशवीची किंमत 300 ते 500 फ्रँक्स सीएफएपर्यंत पोहोचली आहे. हे प्रचंड महाग आहे.

बमाकोमध्ये आइस क्यूब्जच्या किमती ब्रेडपेक्षाही महाग झाल्या आहेत. ब्रेडची साधारण किंमत 250 फ्रँक्स सीएफएपर्यंत असते. कधी-कधी दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे जेवण खराब होतं आणि ते फेकून द्यावं लागतं. मालीमध्ये विजेची समस्या जवळपास वर्षभराआधी झाली होती. सरकारी वीज कंपनीवर गेल्या काही वर्षांत कोट्यवधी डॉलर्सचं कर्ज झालं होतं. त्यानंतर ते मागणीच्या प्रमाणात वीज निर्मिती करण्यात अपयशी ठरले.

Back to top button