सातशे वर्षांपासून पक्ष्यांच्या घरट्यांसारख्या घरात निवास! | पुढारी

सातशे वर्षांपासून पक्ष्यांच्या घरट्यांसारख्या घरात निवास!

तेहरान : ‘एक बंगला बने न्यारा’ हे अनेकांचे स्वप्न असते. अर्थात बंगला बांधणे सर्वांनाच शक्य होत नसले तरी डोक्यावर हक्‍काचे छप्पर असावे इतकी अपेक्षा तरी असतेच व त्यासाठी माणूस धडपडत असतो. मात्र, इराणमध्ये गेल्या सातशे वर्षांपासून एका समुदायाचे लोक मोठ्या शिळा, टेकड्यांमध्ये खोदलेल्या व पक्ष्याच्या घरट्यासारख्या वाटणार्‍या घरांमध्ये राहत आले आहेत.

इराणच्या कंदोवन नावाच्या गावात ही अनोखी घरे आहेत. कठीण शिळा असलेल्या डोंगराळ भागात हे गाव आहे. अनेक पिढ्यांपासून या घरांमध्ये लोक राहत आलेले आहेत आणि या 21 व्या शतकातही ही घरे नांदती आहेत हे विशेष! ही घरे पक्ष्यांच्या घरट्यासारखी जरी दिसत असली तरी त्यांची स्वतःची खासियत आहेच. या परिसरावर एके काळी मंगोल आक्रमणे होत असत. अशा हल्ल्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक डोंगरांवर राहण्यासाठी गेले व तिथे अशी घरे बनवून राहू लागले.

कालौघात ही त्यांची स्थायी घरेच बनून गेली. ही घरे साधी असली तरी अतिशय उपयुक्‍तही आहेत. हिवाळ्यात ती ऊबदार राहतात तर उन्हाळ्यात गारवा देतात. त्यामुळे येथे राहणार्‍या लोकांना एअरकंडिशनर किंवा हिटरचा वापर करावा लागत नाही. काळाप्रमाणे लोकांनी यामध्ये अनेक अनुकूल बदलही केलेले असून ती आतून सुसज्ज आहेत. जगभरातील पर्यटक हे अनोखे गाव पाहण्यासाठी येत असतात.

हेही वाचलतं का?

Back to top button