शहरात यांत्रिकी पद्धतीची स्वच्छता ठप्प; ठेकेदाराच्या गाड्या बँकेने केल्या जप्त | पुढारी

शहरात यांत्रिकी पद्धतीची स्वच्छता ठप्प; ठेकेदाराच्या गाड्या बँकेने केल्या जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध रस्त्यांवर यांत्रिकी पद्धतीने (मॅकेनिकल स्वीपिंग) करण्यासाठी काम दिलेल्या कंपनीच्या गाड्या बँकेने जप्त केल्याने तीन झोनमधील रस्त्यांच्या स्वच्छतेचे काम ठप्प झाले आहे. यामुळे या झोनमधील रस्ते आणि उड्डाणपुलांवरही कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, रस्त्यांच्या कडेला माती आणि वाळू साठल्याने त्यावरून दुचाकी घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यात येते. रात्रीच्या वेळी या वाहनांमार्फत सफाई होत असते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले आहेत.

तसेच वाळू आणि माती देखील पसरली आहे. विशेषत: सातारा रस्ता, सोलापूर रस्ता आणि या मार्गांवरील उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येतो. वाळू आणि कचर्‍यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, शहरातील रस्त्यांचे दोन ठेकेदारांमार्फत मॅकेनिकल स्वीपिंग केले जाते. यापैकी एका ठेकेदाराकडे दोन झोनचे, तर दुसर्‍याकडे तीन झोनमधील रस्तेसफाईचे काम आहे.

एका ठेकेदार कंपनीकडील स्वीपिंगची वाहने बँकेने नेल्याने काही आठवड्यांपासून तीन झोनमधील रस्त्यांच्या सफाईचे काम थांबले आहे. हे रस्ते आणि उड्डाणपुलांची स्वच्छता करण्याचे आदेश संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. लवकरच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वच्छता करण्यात येईल तसेच लोकसभा आचारसंहिता संपताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

हेही वाचा

Back to top button