उमरखेड : कचरा संकलन-विल्हेवाट घोटाळ्यातील चौघांचा जामीन फेटाळला, २८ फेब्रुवारी सुनावणी | पुढारी

उमरखेड : कचरा संकलन-विल्हेवाट घोटाळ्यातील चौघांचा जामीन फेटाळला, २८ फेब्रुवारी सुनावणी

उमरखेड (यवतमाळ) : पुढारी वृत्तसेवा
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गंत  २०१८ साली उमरखेड नगरपालीकेत झालेल्या ६५ लाख ७० हजार रुपयांच्या कचरा संकलन व विल्हेवाट घोटाळ्यात, तात्कालीन नगराध्यक्ष तथा आमदार नामदेव ससाणे यांच्यासह ५ जणांना अंतरिम जामीन मिळाला आहे. नंतर शुक्रवारी(दि,१८) या  प्रकरणातील आरोपींपैकी चार जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, पुसद येथील अतिरीक्त  जिल्हा  सत्र न्यायलयाने सदर अर्ज फेटाळून या प्रकरणातील सर्व आरोपींची एकत्रित सुनावणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

या बहुचर्चित घोटाळाप्रकरणी उमरखेड पोलीस स्टेशनला एकुण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आमदार ससाणे, चंद्रशेखर जयस्वाल , दिलीप सुरते , सविता पाचकोरे, अमोल तिवरंगकर यांना  पुसद सत्र न्यायालयाने ११ तारखेला अंतरिम जामीन मंजूर केला.  त्यानंतर शुक्रवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी यातील आरोपी फिरोजखान( मॅकनिक) , गजानन मोहळे, लेखापाल सुभाष भुते,आरोग्य निरीक्षक, विशाल श्रीवास्तव यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; परंतु त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला.

सदर घोटाळा सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून नियोजनबध्द पध्दतीने केल्याचा आरोप करीत संबंधितांवर आणखी दोन नवीन कलमामध्ये वाढ करावी, असा अर्ज पोलीसांनी न्यायलयासमोर केला. परिणामी आरोपींची वेगवेगळी सुणावणी घेण्यापेक्षा,या प्रकरणातील सर्वच आरोपींची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती आर्थिक गुन्हे शाखेचे  तपास अधिकारी, अप्पर जिल्हा पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी सरकारी वकिलांमार्फत न्यायालयाला  केली . यावरून न्यायालयाने  चारही आरोपींचा जामिन अर्ज फेटाळून लावला व येत्या २८ फेब्रुवारी रोजी प्रकरणातील सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणाचा कागदोपत्री तपास असल्याने  रेकॉर्डनुसार पुरावे मिळविण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. या प्रकरणात आधीच्या भादंवि 420 , 409, 465 , 467, 468, 471  नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर सदर प्रकरणात न्यायालयात म्हणणे सादर करताना आणखी भादंवि 120 (ब ), 4O6 या दोन कलमांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली.

 पाहा व्‍हिडीओ :

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

हेही वाचा :

 

Back to top button