34 हजार रुपयांचे खाऊन हॉटेलातून पसार झाले कुटुंब! | पुढारी

34 हजार रुपयांचे खाऊन हॉटेलातून पसार झाले कुटुंब!

लंडन : ‘तेजाब’ चित्रपटामध्ये पोटभर खाऊन हॉटेलातून बेमालूम पलायन करणार्‍या तरुणांचे एक द़ृश्य आहे. असे प्रकार करणारे अनेक लोक असतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत 8 जणांचं एक कुटुंब अव्वाच्या सव्वा बिल न भरताच पसार झाल्याचं पाहायला मिळतंय. या कुटुंबाने तब्बल 34 हजार रुपयांचं बिल होईल इतके पदार्थ खाल्ले होते. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

हॉटेल व्यवस्थापनाने या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. कुटुंबातील महिलेने आपल्या कार्डद्वारे हॉटेलचं बिल भरण्याचा प्रयत्न केला. दोनवेळा प्रयत्न करूनही कार्डमधून पेमेंट झालं नाही. त्यानंतर या महिलेने आपण घरी जाऊन नवीन कार्ड घेऊन येतो, असं हॉटेल मॅनेजरला सांगितलं. कार्ड घेऊन येईपर्यंत आपला मुलगा हॉटेलमध्येच थांबेल, असंही त्या महिलेने सांगितलं. बराच वेळ उलटून गेल्यानंतरही महिला हॉटेलमध्ये परतली नाही; तर हॉटेलमध्ये थांबलेला मुलगा गर्दीचा फायदा घेऊन नजर चुकवत हॉटेलमधून गायब झाला. मुलगा हॉटेलमधून गायब झाल्यानंतर कुटुंबाने फसवल्याचं हॉटेल मॅनेजरच्या लक्षात आलं.

संपूर्ण कट आखून या कुटुंबाने हॉटेलची फसवणूक केली होती. हॉटेलमध्ये जागा बूक करताना या कुटुंबाने जो नंबर दिला होता तोही चुकीचा होता. यानंतर हॉटेलने त्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोस्टमध्ये हॉटेल व्यवस्थापनाने आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचंही सांगितलं. पोस्टमध्ये हॉटेलने म्हटलंय, ‘आमच्याकडे तुम्हाला संपर्क करण्याचा दुसरा कोणताच पर्यात नव्हता. तुम्ही रिझर्व्हेशनसाठी दिलेला मोबाईल नंबरही खोटा आहे. त्यामुळे तुमची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हॉटेलची फसवणूक करण्याचा प्रकार लज्जास्पद आहे.’

Back to top button