पुढारी ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात पुन्हा एकदा एव्हियन एनफ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूचा (Bird flu) धोका निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेहलोली गावातील पोल्ट्री फार्ममधील सुमारे १०० कोंबड्या मरण पावल्या आहेत. मृत कोंबड्याचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, या कोंबड्यांच्या मृत्यू H5N1 एव्हियन एनफ्लूएन्झाने झाल्याची पुष्टी झाली आहे.
बर्ड फ्लू हा एक पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. H5N1,H5N8 यासह बर्ड फ्लूच्या विषाणूच्या एकूण आठ प्रजाती आहेत. विशेषतः स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा आजार वेगाने पसरतो. यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील वेहलोली गावातील बाधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिघात येणाऱ्या सुमारे २५ हजार पक्ष्यांना मारण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाला संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील बर्ड फ्लू (Bird flu) संसर्गाची माहिती केंद्रीय मत्स्योद्योग आणि पशुसंवर्धन मंत्रालयाला देण्यात आली आहे. याआधी बुधवारी, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ (OIE) ने अहवाल दिला होता की बिहारमधील एका पोल्ट्री रिसर्च फार्ममध्ये अत्यंत संसर्गजन्य H5N1 बर्ड फ्लू विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे.
OIE ने सांगितले आहे की, भारत सरकारने पाठवलेल्या अहवालानुसार पाटणा येथील पोल्ट्री फार्ममध्ये ३,८५९ पैकी ७८७ पक्षी या विषाणूमुळे मरण पावले आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित सर्व पक्ष्यांनाही मारण्यात आले आहे.
हे ही वाचा :