Saurabh Kumar : 'आयपीएल'मध्ये नकार, टीम इंडियासाठी हाेकार! 'या' खेळाडूने मिळवले भारतीय क्रिकेट संघात स्‍थान | पुढारी

Saurabh Kumar : 'आयपीएल'मध्ये नकार, टीम इंडियासाठी हाेकार! 'या' खेळाडूने मिळवले भारतीय क्रिकेट संघात स्‍थान

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्ध फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सौरभ कुमार याला संघात स्‍थान मिळाले असून, ही सर्वात आश्‍चर्यकारक निवड  (Saurabh Kumar) असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. २८ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्‍हणजे, नुकत्याच झालेल्या आयपीएल महालिलावात सौरभला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. सौरभची मूळ किंमत २० लाख रुपये होती. २०२१ च्या लिलावात सौरभला पंजाब किंग्जने  २० लाख रुपये मानधन देत आपल्‍या संघात स्‍थान दिले हाेते.

सौरभ बागपतचा रहिवासी… (Saurabh Kumar)

सौरभ कुमार (Saurabh Kumar) हे भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. सौरभने २०१४ मध्ये सर्व्हिसेस संघाकडून प्रदार्पण करत हिमाचल प्रदेशविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला होता. यानंतर तो त्याचे ‘होम स्टेट’ उत्तर प्रदेशकडून खेळू लागला.

१९६ बळी घेतले आणि दोन शतके झळकावली…

सौरभ कुमारने आतापर्यंत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २४.१५ च्या सरासरीने १९६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १६ वेळा एका डावात ५ आणि ६ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून त्याने २९.११ च्या सरासरीने १५७२ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे.

भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिकेला गेला होता…

सौरभ कुमार हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा एक भाग होता. मात्र, तेथे त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने दोन अनऑफिशियल कसोटी सामन्यांमध्ये चार विकेट घेतल्या. तर फलंदाजीत त्याला केवळ २३ धावाच करता आल्या.

Back to top button