US | जीवघेणा वेग! अमेरिकेत ३ भारतीय महिलांचा मृत्यू, SUV कार धडकेनंतर २० फूट उंच हवेत उडाली | पुढारी

US | जीवघेणा वेग! अमेरिकेत ३ भारतीय महिलांचा मृत्यू, SUV कार धडकेनंतर २० फूट उंच हवेत उडाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील एका भीषण अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही महिला गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील आहेत. रेखाबेन पटेल, संगीताबेन पटेल आणि मनीषाबेन पटेल अशी त्यांची नावे आहेत. दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले काउंटीमधील आंतरराज्य ८५ वर ही घटना घडली.

हा अपघात भयानक होता. तीन महिला ज्या SUV मधून प्रवास करत होत्या तिचा वेग भरधाव होता. यादरम्यान चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले आणि ती दुभाजकावर धडकली. त्यानंतर एसयूव्ही पुलाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या झाडांवर आदळण्यापूर्वी २० फूट उंच हवेत उडाली. यात तिघींचा मृत्यू झाला. तर कारचा चक्काचूर झाला. या अपघातग्रस्त वाहनाचे अवशेष झाडाला अडकले होते. तसेच कारचे अनेक तुकडे झालेले आढळून आले.

“सदर एसयूव्ही कार रहदारीच्या सर्व चार पदरी रस्ता ओलांडून जमिनीपासून कमीतकमी २० फूट उंचीवर उडून झाडांवर आदळली,” अशी माहिती ग्रीनविले काउंटी कोरोनर कार्यालयातील मुख्य अधिकारी माईक एलिस यांनी foxcarolina.com न्यूजशी बोलताना दिली. एका वृत्तानुसार, सदर अपघातग्रस्त वाहन चालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.

एलिस यांनी सांगितले की, SUV चा वेग मर्यादेपेक्षा अधिक होता. ते पुढे म्हणाले, “तुम्ही क्वचितच एखादे वाहन ४-६ पदरी रस्त्यावरून सुमारे २० फूट उंच उडून झाडांवर आदळलेले पाहिलेले असेल.”

या अपघातात इतर कोणत्याही वाहनांचा समावेश नव्हता. वाहनाचा भरधाव वेग हेच या भीषण अपघाताला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button