वेल्हे : डिंगोरा पिटवूनही तोरणागड अंधारातच, महावितरण व पुरातत्व खात्याचा वेळकाढूपणा | पुढारी

वेल्हे : डिंगोरा पिटवूनही तोरणागड अंधारातच, महावितरण व पुरातत्व खात्याचा वेळकाढूपणा

दत्तात्रय नलावडे
वेल्हे : राज्यातील अतिदुर्गम व अतिउंचीवर असलेल्या छत्रपती शिवरायांनी जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची स्थापना केलेल्या तोरणागडाचे विद्युतीकरण झाल्याचा देशभरात डिंगोरा पिटविण्यात आला. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तोरणागड अंधारातच आहे. महावितरण व पुरातत्व विभाग ठप्प पडल्याने तोरणागडावरील शिवकालीन श्री मेंगाई मंदिरासह सर्व ऐतिहासिक वास्तू, स्थळे अंधारातच आहेत.

स्वातंत्र्यानंतर तोरणागडावर वीज पोहचली म्हणून मावळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. महावितरणचे राज्यभर कौतुक करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गडावर विजेचा दिवा अथवा मीटरही बसविण्यात आला नाही. विद्युतीकरणाचा गाजावाजा करण्यासाठी गडाच्या हनुमान बुरुजावर एक विजेचा दिवा लावला. त्यामुळे गडाखालून दिव्याचा प्रकाश दिसला. गडाच्या मुख्य वेल्हे मार्गाच्या बिन्नी दरवाजाच्या अलिकडे हनुमान बुरुजावर विजेचा फीडर बॉक्स बसवला आहे. बुरुजाच्या तटबंदीवर असलेल्या निरगुडीच्या झाडालाच एक विजेचा दिवा टांगला होता. त्या दिव्याचा प्रकाश गडाखाली काही दिवसच दिसला. अवघ्या आठ दिवसांनंतर हा दिवा बंद पडला. दुसरीकडे गड मात्र अंधारात आहे.

श्री मेंगाई मंदिरापर्यंत वीज जाणार होती. मात्र, ती कागदावरच राहिली आहे. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तोरणागडाच्या विद्युतीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लगेचच मालकीच्या जमिनीवर विजेचे खांब उभे केल्याने वन खात्याने हरकत घेतली आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठपातळीवर जोरदार हालचाली झाल्या.
वन खात्याच्या जागेतील आठ खांब हटविण्यात आले. दुसर्‍या बाजूला मालकीच्या जागेतून खांब बसविण्यात आले. त्यानंतर पुन्हा हनुमान बुरुजावर वीजपुरवठा सुरू केला.

गडावर जाणार्‍या वेल्हे पायमार्गावरील पांच पांडव पादुका टेकडीवर विजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे गडाच्या बुरुजावरील वीजपुरवठा जानेवारी महिन्यापासून बंद आहे.
– दादू वेगरे, तोरणागडावरील पुरातत्व खात्याचे पाहरेकरी

तोरणागडाच्या बुरुजावर वीजपुरवठा करण्यात आला आहे. तेथून पुढे पुरातत्व विभागाने विजेचे वायरिंग करून वीज घ्यावी. महावितरणला पुरातत्व खात्याच्या जागेत काम करता येत नाही. मेंगाई मंदिर व इतर वास्तूत वायरिंग केल्यास तसेच बुरुजावरून सुरक्षित केबल टाकल्यास आम्ही वीजमीटर देणार आहे.
– संतोष शिंदे, शाखा अभियंता, महावितरण, वेल्हे विभाग

बुरुजावरून गडावरील मंदिर व इतर ठिकाणी वीजपुरवठा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रस्तावित खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. त्यानंतर विजेचे दिवे बसविण्यात येणार आहेत.
– विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व पुणे विभाग

तोरणागडावर वीजपुरवठा झाला म्हणून गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात गडावर वीज गेली नाही. सर्व खात्यांमध्ये समन्वय नसल्याने स्वातंत्र्यानंतरही गड अंधारातच आहे.
– शंकरराव भुरुक, माजी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button