Weather Update : आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात | पुढारी

Weather Update : आजपासून मृग नक्षत्राला सुरुवात

संगमेश जेऊरे


सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : 
मृगाचे वाहन कोल्हा : कोल्ह्याची कोलांट उडी की धो धो बरसणार, मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरहवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला आहे. दोन दिवसांत सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मागील वर्षापेक्षा यंदा मान्सूनचे 18 दिवस लवकर आगमन होत आहे. मृग नक्षत्रातील पावसाला शुक्रवारपासून (दि.7) उत्तर रात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरुवात होत आहे. चातकासारखे वाट पाहणार्‍या बळीराजाला यंदा मान्सून दिलासा देईल अशी आस आहे.

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात बरसायला सुरुवात केली आहे. मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात होताच वातावरणात बदल होत तापमान घसरते. (दि.7) जूनपासून बळीराजा पाऊस आल्यानंतर ओल्याव्यानुसार पेरणीस सुरुवात करतो. 7 जून ते 20 जून दरम्यान झालेल्या पेरणीतून कमी रोगराई , उत्पादन अधिक असा अनुभव असते. त्यासाठी कुठल्या नक्षत्रावर पाऊस कसा बरसणार याचा अंदाज त्या नक्षत्राच्या वाहनावरुन बांधला जातो.

मृग : वाहन कोल्हा : अत्यल्प पाऊस

शुक्रवारपासून (दि. 7) सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. प्रवेशावेळी कुंभ लग्न उदित आहे. या नक्षत्रात अत्यल्प स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेवटच्या टप्यात चांगल्या पावसाचा योग आहे. दि. 7, 8, 11, 12, 18, 19 जून रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

आर्द्रा : मोराच्या पंखाचा पिसारा फुलणार

शुक्रवारी (दि. 21) रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्याचे वाहन मोर आहे. राज्यात सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अत्यल्प पाऊस होण्याचे योग आहेत. दि. 22 ते 25 आणि 30 जून तसेच दि. 3 ते 5 जुलै रोजी पाऊस होण्याचा योग आहे.

पुनर्वसु : वाहन हत्ती पण…

शुक्रवारी (दि. 5 जुलै) रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश होणार आहे. प्रवेशावेळी मीन लग्न असून वाहन हत्ती आहे. ग्रहयोगांनुसार कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस राहणार नाही. दि. 5 ते 7, 11 ते 14 आणि दि. 17 ते 19 जुलै रोजी पावसाची शक्यता आहे.

पुष्य : बेडूक आवाज करणार

पुष्य पावसाला म्हातारा पाऊस म्हणूनही ओळखले जाते. शुक्रवारी (दि. 19 जुलै) रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन बेडूक आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. यासोबतच पूर येण्याची शक्यता आहे. दि. 20 ते 24, 27 ते 29 जुलै आणि दि. 29 जुलै ते 1 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे.

आश्लेषा : आसळकाचा पाऊस, वाहन गाढव

शुक्रवारी (दि. 2 ऑगस्ट) रात्री 10 वाजून 06 मिनिटांनी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे तर त्याचे वाहन गाढव आहे. पाऊस चांगला होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. विदर्भ-मराठवाडा, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल. तर कोकणात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची चिन्हे आहेत. दि. 3 ते 6, 8, 9 आणि दि. 13 ते 14 ऑगस्ट रोजी पाऊस अपेक्षित आहे.

मघा : सासूचा पाऊस खंडित, वाहन कोल्हा

मघा नक्षत्र पावसाला सासूचा पाऊस म्हणूनही ओळखले जाते. शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) रात्री 7 वाजून 44 मिनिटांनी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. राज्यात खंडित स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दि.18, 20 ते 22, दि. 28, 29 ऑगस्ट रोजी पाऊस अपेक्षित आहे.

पूर्वा फाल्गुनी : सुनांचा पाऊस चांगला बरसणार

पूर्वा फाल्गुनी पावसाला सुनांचा पाऊस म्हटले जाते. शुक्रवारी (दि. 30 ऑगस्ट) दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. प्रवेशावेळी धनू लग्न उदित असून या नक्षत्राचा संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची लक्षणे आहेत. काही ठिकाणी अतिपाऊस होण्याची शक्यता आहे. साधारण मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये याचा परिणाम दिसेल.

उत्तरा फाल्गुनी (रब्बीचा पाऊस), वाहन हत्ती

उत्तरा फाल्गुनीला रब्बीचा पाऊस म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी (दि. 13 सप्टेंबर) सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. नक्षत्राचा सर्वत्र साधारण पाऊस होईल. 14 ते 26 सप्टेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे.

हस्त नक्षत्रात सुद्धा पुन्हा मोर पिसारा फुलविणार

हस्त पावसाला हत्तीचा पाऊस म्हणून ओळखले जाते. गुरुवारी (दि. 26 सप्टेंबर) उत्तर रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन मोर आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागात अतिपाऊस होण्याची शक्यता आहे. दि. 27 सप्टेंबर ते दि. 1, 4, 5, 8, 9 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता आहे.

Back to top button