पावसाळी दिवसात शेवगा गुणकारी, जाणून घ्या फायदे… | पुढारी

पावसाळी दिवसात शेवगा गुणकारी, जाणून घ्या फायदे...

डॉ. प्रिया दंडगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लहानपणी एक गोष्ट वाचली होती. गरीब कुटुंब अनेक दिवस परसदरातील शेवगा खावून जगते आणि सुदृढ राहते असा त्याचा आशय होता. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात परसदारी अंगणात एखादी शेवग्याच्या शेंगाचे झाड असायचे. ज्याला भरपूर प्रमाणात शेंगा लागायच्या. शेवग्याच्या शेंगा आमटीत टाकून खाणे, फुलांची भाजी करणे आणि मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शेवग्याच्या पानांची भाजी खाणे, ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

शेवगा हा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

शेवगा ही अतिशय गुणकारी ,सहज मिळणारी भाजी आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ही भाजी खाल्ली जाते कारण यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात. पावसाळा बाधू नये , नव्या पाण्याचा त्रास होवू नये म्हणून सुरवातीला ही औषधी भाजी खाल्ली जाते. कृष्ण जन्मदिवशी देखील शेवग्याच्या पानांची भाजी आवर्जून खाल्ली जाते. काहीशा तुरट चवीची ही भाजी खायला लोक फारसे उत्सुक नसतात. आजकाल सर्वत्र जागरूकता वाढल्यामुळे शेवग्याची पाने, शेंगा, फुले लोकांनी खावीत म्हणून शेवगा महोत्सवाचे आयोजन देखील केले जाते.

जगभरात शेवग्याची मागणी

भारतात सर्वच प्रदेशात शेवग्याचे झाड आढळते. त्याच्या अनेक प्रजाती देखील आहेत. जगातील सर्वात जास्त शेवगा उत्पादन करणारा देश म्हणून भारताला ओळखले जाते. आज-काल जगभर शेवग्याच्या पानांच्या पावडरला मोरिंगा पावडर म्हणून जबरदस्त मागणी आहे. भारतीय सुपरफुड म्हणून शेवग्याच्या पानांच्या पावडरला विशेष स्थान मिळाले आहे.

शेवगा देते दुधापेक्षा दहापट जास्त कॅल्शिअम

शेवग्याचे अख्खे झाडच औषधी आहे. शेवग्याच्या गोल छोट्या पानांची घरोघरी भाजी केली जाते. डाळ, कांदा घालून केलेली ही भाजी भाकरी सोबत खावी अशी आपली पद्धत आहे. शेवग्याच्या पानांमध्ये दुधाच्या दसपट कॅल्शियम आहे. कॅल्शियम चा इतका मुबलक आणि स्वस्त स्रोत दुसरा कोणताही नाही. त्यामुळे सर्व स्त्रियांनी शेवग्याच्या पानांची पावडर रोज एक चमचा पाण्यातून घेतल्यास त्यांची हाडे बळकट होण्यास मदत होते. वाढत्या वयातल्या मुलांना ही शेवग्याच्या पानांची भाजी, शेंगा खाऊ घातल्यास त्यांची उंची भरभर वाढते. असं म्हणतात की शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे तुमचे मूल शेवग्याच्या शेंगेसारखेच काटक आणि उंच होईल.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेवगा लाभदायक

शेवग्यामध्ये विटामिन सी देखील विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालक भाजीच्या पाचपट लोह यामध्ये आहे. याचबरोबर विटामिन ए , विटामिन बी2, बी3 विपुल प्रमाणात आहे. मॅग्नेशियम, झिंक हे देखील भरपूर प्रमाणात आहे. लोह चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेवग्याची भाजी खाणे म्हणजे भरपूर प्रमाणात पोषणमूल्य मिळवण्यासारखे आहे. यात प्रभावी अँटी ऑक्सिडन्ट्स असल्यामुळे तरुण राहायला मदत होते. यासोबतच कर्क रोगांपासून संरक्षण मिळते.

भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक गरीब व्यक्तीला देखील सहजासहजी उपलब्ध होणारी भाजी म्हणजे शेवग्याची भाजी होय. कुपोषित मुलांसाठी तर ते वरदान आहे. शेवग्याच्या पानांचा काढा, फुलांची पावडर औषधी आहे. यात जंतुनाशक, बुरशीनाशक गुण असतात. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवायला ही मदत करते. शेवग्याच्या फुलांमध्ये देखील प्रभावी अँटिऑक्सिडंट आहेत. त्यामुळे फुले वाळवून त्याची पावडर देखील खाल्ली जाते. सौंदर्य वाढीसाठी उपयोगी पडते. शेवग्यामध्ये रक्तदाब नियंत्रित करण्याची विशेषता आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता दूर व्हायला मदत होते.

मुतखडा पाडण्यासाठी शेवगा गुणकारी

शेवगा नियमित खाल्ल्याने मूतखडा पडण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात लघवी होते. वजन कमी करण्यासाठी शेवगा मदत करतो. तसेच शेवगा खाल्ल्यामुळे केस गळण्याचे थांबते. पावसाळ्यात होणारे सर्दी पडसे, ताप, खोकला यासारखे आजार दूर ठेवायचे असल्यास अधून मधून शेवग्याची पानांची भाजी, आमटीत, कढीत, पिठल्यात शेंगा टाकून खाव्यात. पराठे, थालीपीठ, भजी, वड्या ,सूप असे पदार्थ खावेत. आपल्या भारतीय आहार परंपरेतील एक महत्वाची परंपरा पुनरुज्जीवित झाली पाहिजे.

Back to top button